रविवार, १४ ऑगस्ट, २०११

कशी करावी सांधेदुखीवर मात..?







सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात सुमारे दोनशेहून अधिक हाडं असतात आणि या सर्व हाडांना जोडणारे त्याहीपेक्षा जास्त सांधे असतात. आपल्या शरीराची पर्यायाने हाडांची हालचाल सांध्यांच्या सहाय्यानेच होत असते. म्हणूनच शरीराच्या हालचालींत सांध्यांच्या क्रीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हल्ली धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी वाढत चालल्याचं दिसून येतं. त्यामुळे सांध्यांची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा शेतकरी, माथाडी कामगार इत्यादी अतिश्रमाची कामं करणाऱ्या व्यक्तींचा सांधेदुखीचा त्रास तोंड वर काढतो. मात्र हल्ली कमी कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी असणाऱ्या महिला, ऑफिसात काम करणारे इतकच काय तर हल्ली शाळा-कॉलेजातील युवा पिढीलाही सांधेदुखीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

सांधेदुखीचा त्रास उद्भवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होणं. बळकटीसाठी हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. हाडांतील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यावर हाडांचा ठिसूळपणा आणि सच्छिद्रपणा वाढतो. परिणामी हाडांची झीज लवकर होते. स्त्रियांच्या बाळंतपणानंतर किंवा वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम संतुलित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण बाळंतपणानंतर आणि वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम कमी होण्याचा धोका जास्त असतो. मात्र कधीकधी अनुवंशिकतेतूनही सांधेदुखीचा त्रास मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येऊ शकतो. काही व्यक्तींच्या गूणसूत्रांतच (HLA B27 किंवा HLA DR4) दोष निर्माण होतो. परिणामी बऱ्याचदा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जीवाणू तसेच विषाणूंची बाधा झाल्याने संधीवाताचा आजार बळावू शकतो. त्यामुळे रक्ताची तपासणी केल्यावर संधीवाताच्या मुळाशी आपण पोहोचू शकतो.

रक्तातील युरिक आम्लाचे प्रमाण वाढल्यास किंवा प्रथिनांसारख्या विशिष्ट पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन झाल्यासही सांधेदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा हल्लीच्या धकाधकीच्या आणि सुपरफास्ट जीवनशैलीत कामाचा व्याप वाढून मानसिक तणाव निर्माण होतो. परिणामी खाण्यापिण्याच्या वेळा बदलणं, पचनासंदर्भातल्या समस्या निर्माण होणं या कारणांमुळेही संधीवाताच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे कित्येकदा अतिनील किरणांमुळे किंवा विशिष्ट प्रकारच्या होर्मोन्सची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे यामुळेही संधीवाताच्या तक्रारी वाढू शकतात. अतिमैदानी खेळ, अतिरक्तस्त्राव तसेच सांध्यांच्या ठिकाणी झालेली दुखापत यामुळेही सांधेदुखीचा त्रास बळावतो. एसी त्याचप्रमाणे थंड वातावरणातही सांध्यांचं दुखणं वाढू शकतं. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी एसीत जाणं शक्यतो टाळावं किंवा एसीत जाताना दुखणाऱ्या सांध्यांना उबदार कपड्यांनी झाकून मगच एसीत प्रवेश करावा.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वातप्रकोपक अन्नाचं सेवन जास्त केल्यास सांध्यांच्या त्रासात वाढ होऊ शकते. म्हणून सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मटकी, वाटाणा, तूर, हुलगे, हरभरा त्याचप्रमाणे चवळी इत्यादी कडधान्याचा आहारातील समावेश कमी करावा अन्यथा त्रास बरा होईपर्यंत पूर्णत: टाळावा. त्याचप्रमाणे इडली, डोसासारख्या आंबवलेल्या पदार्थांचंही सेवन करू नये. पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांचं सेवन टाळावं. अतिस्निग्ध तसेच तळलेले, तिखट पदार्थही जास्त प्रमाणात खाऊ नये. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी दही, ताक तसेच लोण्यासारख्या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करावं. अवेळी जेवण किंवा भूक नसताना खाण्याच्या सवयी जशा अनेक आजारांचं कारण बनतात तशाचं या सवयी संधीवातालाही आमंत्रण ठरतात. त्यामुळे वेळेवर आणि भूक असेल तेवढंच जेवण करणं गरजेचं असतं. कारण पित्त आणि गॅस निर्माण झाल्यास सांधेदुखीचा त्रास बळावण्याची भीती असते. अतिलंघन म्हणजेच उपवासही संधीवाताला निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे संधीवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी उपवास शक्यतो टाळावेत.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लघवी जास्त काळ तुंबून ठेवू नये. मल-मूत्र विसर्जन ही शरीराची नैसर्गिक आणि अपरिहार्य प्रक्रिया असल्याने ती वेळेवर करावी.

मानवी शरीरातील हाडांमध्ये एकप्रकारचा द्रव पदार्थ असतो. आपण जेव्हा हालचाली करतो तेव्हा हा द्रव पदार्थ हाडांमधील घर्षण कमी होण्यास मदत करतो. मात्र हाडांमधला द्रव पदार्थ कमी झाल्यास हाडांचं घर्षण जास्त प्रमाणात होऊन सांधेदुखीचा त्रास उद्भवतो किंवा दुर्लक्ष केल्यास हाडं ठिसूळ होऊन हाडांची मोठ्या प्रमाणात झीज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी रात्री झोपताना एरंड तेलाने दुखणाऱ्या सांध्याचं मालिश केल्यास फायदेशीर ठरतं. कारण एरंड तेलाने मालिश केल्यास विकृत वायू बाहेर पडून सांधदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. आहारात खारीक, खोबरे, दूध, ड्राय फ्रूट तसेच तुपाचा समावेश असावा. तसेच कॅल्शियम कमी झाल्याने सांधेदुखी वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्यात.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई (संपर्क- 9222360448)
Dr.kirtidhobale@gmail.com

२ टिप्पण्या:

  1. मला मणक्याचा संधिवात आहे या आजारांवर VAX D TREATMENT (Vertrible axieal decompression) उपयोगी आहे का ?

    उत्तर द्याहटवा
  2. मला मणक्याचा संधिवात आहे या आजारांवर VAX D TREATMENT (Vertrible axieal decompression) उपयोगी आहे का ?

    उत्तर द्याहटवा