शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

आजारांची वर्दी...त्रासदायक सर्दी

वातावरणातील सततच्या बदलांनी, सततच्या प्रवासाने तसेच अचानक आहार-विहारात घडलेल्या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर पहिला हल्ला सर्दी करते. सर्दीचा त्रास सुरू झाला की आपोआपच डोकेदुखी तसेच कित्येकदा
खोकल्याचा त्रासही डोकं वर काढतो. मुळात सर्दी ही अनेक आजारांची जननी समजली जाते. त्याचप्रमाणे तापासारख्या अनेक आजारांची वर्दी म्हणजे पूर्वसूचनाही सर्दीच देते. सर्दीचा हा मुख्यत्वेकरून हिवाळ्यात उद्भवनारा आजार समजला जातो. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.


आधी पातळ असलेली सर्दी उत्तरोत्तर घट्ट होत जाते. सर्दी पडशात बारीक ताप येण्याचीही शक्यता असते. नाक बंद होऊन लालसर होते, घसा खवखवतो तसेच घशात खाजल्यासारखे होते. सर्दी झाल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास थकवा जाणवतो आणि जास्त दिवस सर्दी तशीच राहिली तर अशक्तपणा वाढत जातो. नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्यानं नाकातून कानाकडे पोहोचणाऱ्या कानाघ नलिकेचे तोंड बंद होण्याची शक्यता असते. कानाघ नलिकेचे तोंड ब्लॉक झाल्याने कानात विशिष्ट संवेदना होणेमुळात सर्दी-पडसे एका विशिष्ट जातीच्या विषाणूंमुळे होते. कधीकधी सर्दी संसर्गामुळेही होऊ शकते. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि कित्येकदा नाकाच्या आतील त्वचेला सूज येते. नाकातून पाणी वाहू लागते. सर्दी झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात नाकातले पाणी पांढरे तसेच पातळ स्वरुपाचे असते.
किंवा कानात गच्चपणा जाणवतो तसेच कानाचे दडेही बसतात.

संसर्गातून झालेली सर्दी दोन-तीन दिवसांत आपोआप बरी होते मात्र अशा सर्दीत थंड पदार्थ वर्ज्य करत खाण्यापिण्याच्या सवयीत प्राथमिक बदल करणे गरजेचं असतं. सर्दी झाल्यावर प्राथमिक उपाययोजना म्हणून भरपूर कोमठ पाणी प्यावं. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात कोबी टाकून त्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना कापूर ठेचून गरम पाण्यात टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच पूर्णपणे विश्रांती घ्यावी. थंड वातावरणापासून दूर राहावं. शक्यतो एसीत जाणं टाळावं. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावं. उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी. घरातलं वातावरण उबदार ठेवावं. शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.

घट्ट झालेली सर्दी नाकपुड्यात साचून राहिल्याने नाक चोंदते आणि श्वसनाला त्रास होतो. नंतर डोकेदुखी सुरू होते. त्याचप्रमाणे घट्ट झालेली सर्दी जास्त काळ राहिल्यास छातीत कफ साचतो आणि खोकला डोकं वर काढतो. खोकला जास्त काळ राहिल्यास फुफुसाचे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकल्यावर त्वरीत इपचार
करणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा खोकल्याचं मूळ टीबीसारख्या आजारातही असतं. त्यामुळे खोकला जास्त काळ टिकल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. धुम्रपान, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. दही, तुप तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. आहार गरम असेल याची काळजी घ्यावी. विविध प्रकारचे सूप सर्दी आणि खोकल्यावर गूणकारी ठरतात. सर्दी आणि खोकल्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपायही करता येतात. मात्र घरगुती उपाय करूनही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

1) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.
2) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.
3) एक चमचा मधात चिमूटभर पांढऱ्या मिरीचं चूर्ण टाकून नीट घोटून आठवडाभर दिवसातून चार ते पाचवेळा घ्यावं.
4) काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं.

5) सुंठ आणि काळी मिरी पावडर मधात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो
6) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकल्यापासून सुटका मिळू शकते
7) हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे.
8) मध आणि आवळा पावडर यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
9) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, एक चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
नवी मुंबई

रविवार, ११ डिसेंबर, २०११

अतिसार : कारणं आणि उपाय

|| गुदेन बहुद्रवसरण अतिसार: || पोटात गेलेल्या अन्नाचं पचन होऊन आणि अंतर्पोटातील विविध क्रिया होऊन अतिद्रव मलाचे अतिसरण म्हणजेच अतिसार किंवा हगवण होय. सुदृढ आणि निर्दोष निरोगी जीवनासाठी योग्य पोषणमूल्य असणारे अन्न पोटात जाणं जितकं गरजेचं असतं तसंच त्याचं निस:रण होणंही तितकच आवश्यक असतं. दिवसातून कितीवेळा अन्नग्रहण व्हावं याचं जसं प्रमाण ठरलेलं असतं तसंच मलनिस:रणही दिवसातून किती वेळा व्हायला पाहिजे याचंही प्रमाण ठरलेलं असतं म्हणूनच आयुर्वेदानुसार अथवा जीवशास्त्रानुसार शौचास जाण्याच्या प्रमाणात अचानक वाढ होणं किंवा अचानक कमी होणं ही व्याधी समजली जाते. प्रौढांमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा शौचास होणं स्वाभाविक असतं. मात्र शौचास होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास अतिसार झाला असं म्हंटलं जातं. लहान बालकांना दिवसातून सर्वसाधारणपणे 7 ते 8 वेळा पातळ,

चिकट, दुर्गंधीयुक्त मलाचे निस्सरण झाल्यास त्याला अतिसार झाला असल्याचं मानावं. पोटात गेलेल्या अन्नातील स्निग्ध पदार्थ पचवून शरीराकडून पोषणमूल्यांचं शोषण होण्याची क्रिया बिघडल्यास वारंवार चिकट व दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. अनेकदा अतिसाराचा आजार मानसिक कारणांतही दडलेला असतो. अतिशोक, तणाव, भयग्रस्तता यांमुळेही वारंवार शौचाला होते. एका अहवालानुसार जगात वर्षाकाठी अतिसारामुळे
व कुपोषणाद्वारे 10 लक्ष मुले मृत्युच्या खाईत लोटली जातात. अतिसारामुळे मृत्यू येणाऱ्यांमध्ये प्रौढांपेक्षा

लहान मुलांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे कारण लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होतं. अतिसार झालेल्या 200 मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाल्याचं एका पाहणीत निष्पन्न झालंय. मात्र फक्त आईचं दूध पिणाऱ्या मुलांना क्वचितच अतिसाराचा त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांना ठराविक वयापर्यंत फक्त आईचं दूध
पाजणं अत्यंत गरजेचं असतं.
मैदा, बेसनाचे पदार्थ, वडापाव, समोसा, लोणी, चीज, पनीर, पिझ्झा, बर्गर, उत्तपा, डोसा, तसेच चायनिज यांसारख्या पचायला जड पदार्थांच्या वारंवार अतिसेवनाने अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे आईस्क्रीम, शितपेयं,बियरसारख्या अतिथंड पदार्थांच्या सेवनानेही अतिसाराचा त्रास होऊ शकतो. मांसाहारी पदार्थाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन, तेलकट, तिखट आणि चिवडा-फरसाणासारख्या मसालेदार पदार्थांच्या अतिसेवनानेही हगवणीचा त्रास उद्भवू शकतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या विरुद्धाहारामुळेही हगवणीची समस्या निर्माण होऊ शकते. दूध आणि मासे, दूध आणि केळी यांसारख्या पचनक्रियेला त्रासदायक विरूद्धाहारामुळे अतिसार झाल्याचं पाहायला मिळतं. अगोदर खाल्लेल्या अन्नाचं पुरेसं पचन होण्याआधी पुन्हा जेवण केल्यानं अपचनाचा त्रास होतो आणि त्याचं पर्यावसान हगवणीत होतं. मात्र या प्रासंगिक अतिसाराशिवाय कित्येकदा आतड्यांचे विकार, काही जुनाट आजार तसेच अतिरक्ताल्पता यामुळेही अतिसाराचा त्रास होत असतो.
अतिसाराची लागण झाल्यावर वारंवार तहान लागणं, शौच करताना असह्य वेदना होणं तसेच प्रचंड अशक्तपणा येणं, झपाट्याने वजन कमी होणं, शौचातून रक्त पडणं यांसारखी लक्षणं जाणवू लागतात. अतिसार झालेल्या रुग्णाचं शरीर थंड पडणं, शरीरातले त्राण निघून जाणं, चक्कर येऊन डोळ्यांपुढे अंधाऱ्या येणं, मूत्रविसर्जनाच्या तक्रारींत वाढ होणं, श्वासोच्छवास तसेच हृदयांच्या ठोक्यांचा वेग
वाढणं, तोंडाला कोरड पडणं, त्वचा सैल आणि निळसर पडणं इत्यादी लक्षणं दिसतात.

मुळात अतिसाराचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच काही घरगुती उपाय करता येतात. 1) बिन दुधाच्या कपभर गरम चहात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतल्यानं हगवण नियंत्रणात येण्यास मदत होते. 2) दोन चमचे डाळिंबाच्या पानांच्या रसात चमचाभर साखर टाकून घेतल्यानेही हगवण थांबते. 3) ग्लासभर नारळाच्या पाण्यात चमचाभर जिरे वाटून टाकल्यानेही आराम मिळतो. 4) पाण्यात उकडलेली कच्ची पपई दिवसातून दोन ते तीन वेळा खावी. 5) हगवण नुकतीच सुरू झाली असेल तर आयुर्वेदात लंघन म्हणजेच उपवासाचा चांगला उपाय सुचवलेला आहे.

अतिसाराचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. म्हणून संपूर्ण बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा नारळपाणी घ्यावं. त्याचप्रमाणे अर्धा लीटर पाण्यात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. साबुदाण्याची गंजी, तांदळाची पेजही प्यावी. पाणी उकळून थंड करूनच प्यावं. उकळून थंड केलेलं पाणी जास्तीत जास्त वेळा प्यावं. अतिसारात पाणी, विविध सरबते, फळांचे रस, नारळपाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरचे बाहेरील खाद्यपदार्थ तसेच
शिळे अन्न टाळावं. तसेच अतितिखट पदार्थही काटाक्षाने वर्ज्य करावेत.

कित्येकदा घरगुती उपाय करूनही हगवण थांबत नसेल तर तज्ज्ञ डोक्टरांचा सल्ला घेऊन अवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. त्याचप्रमाणे अतिसाराच्या आजारातून बाहेर पडल्यावरही अतिसार पुन्हा उद्भवू नये
म्हणून योग्य काळजी घ्यावी लागते. हगवण थांबली असली तरी खाण्यापिण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. टप्प्याटप्प्याने जेवण वाढवल्यास पोटाच्या आतड्यांना होणारा त्रास टाळणं सोपं जातं.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई