शुक्रवार, २९ जुलै, २०११

कसा असावा चिमुकल्यांचा आहार..?

‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं आपण नेहमी म्हणतो, पण अन्न हे पूर्णब्रम्ह असल्याची जाणीव आपल्यासारख्या प्रौढांना होते, लहान मुलं मात्र या सर्व बाबींपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांचा आहार सर्वसमावेशक आणि जास्तीतजास्त पोषणमूल्य असावा याची काळजी पालकांनाच घ्यावी लागते. कधी कधी एखादा पदार्थ मुलांना खूप आवडतो, तर कधी कधी एखादा पदार्थ समोर आला की मुलं नाकं मुरडतात. अशावेळी मुलांना आवडणारा पदार्थ पोषणमूल्य असणारा आहे का याची काळजी घ्यावी लागते किंवा मुलांना न आवडणारा पदार्थ कदाचित मुलांच्या शारीरिक वाढीसाठी उपयुक्त ठरणारा असेल तर तो पदार्थ खाण्यासाठी मुलांची समजूत घालण्याची तारेवरची कसरत पालकांना करावी लागते.

आयुर्वेदानुसार आहाराच्या दृष्टीने प्रमुख तीन अवस्था समजल्या जातात. बाळ जन्मल्यापासून एक वर्षापर्यंत क्षीराद, एक ते तीन वर्षांपर्यंत क्षीरान्नाद आणि तीन वर्षांपासून अन्नाद या आहाराच्या प्रमुख तीन अवस्था असतात. तीन ते सहा वर्षाच्या वयात मुलं षडरसयुक्त संपूर्ण आहार घेऊ शकतात. तीन ते सहा वर्ष वय असणाऱ्या मुलांना सकाळच्या जेवणात ऋतुमानानुसार पालेभाज्या, कडधान्याच्या उसळी, पोळी, कोशिंबिर, ताक अशा आहाराची सवय मुलांने लावणं गरजेचं आहे. तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी पुरेशा प्रमाणात निर्माण झालेल्या नसतात किंबहुना याच वयात त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विकसित होत असतात, त्यामुळे मुलांना योग्य तो आहार घेण्याची सवय लावणं याच वयात गरजेचं आणि सोप्पही असतं.

मुलांना दुपारच्या जेवणात ऋतुनुसार फळे, साजूक तुपातले, डिंकाचे, मुगाचे अथवा राजगिऱ्याचे लाडू, मनुके, अंजीर, बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचा वापर असणारे पदार्थ किंवा साळीलाह्यांचा, कुरमुऱ्यांचा किंवा शेंगदाण्याचा चिवडा द्यावा.

रात्रीचं जेवण मात्र पचायला हलकं असेल याकडे लक्ष द्यावं, वेगवेगळे पराठे, घिरडे, तांदूळ किंवा मुगाची खिचडी, भाज्या किसून आणि वाफवून बनवलेली कोशिंबिर, उकडलेली अंडी आणि पोळी इत्यादींचा रात्रीच्या जेवणात समावेश असावा. तीन ते सहा वर्ष हा मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाचा काळ असल्याने दूध, दुधाच्या पदार्थांचाही जेवणात योग्य प्रमाणात समावेश असावा. मुलांना जास्तीत जास्त गायीचं दूध देण्याकडे भर असावा. या वयात मैद्याच्या पदार्थांसह मसालेदार पदार्थ मुलांना खाण्यास देण्यास शक्यतो टाळावं. पाव, ब्रेड, केक, यांच्या अति सेवनामुळे बद्धकोष्टतेचा धोका संभवत असल्याने आणि आतड्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांचा वापर कमीत कमी करावा. चॉकलेट, शीतपेयांचंही सेवन प्रमाणात असावं.

हल्ली एज्युकेशनचा जमाना असल्याने आणि प्लेग्रुप नर्सरी, केजीच्या जमान्यात मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच शाळेत जावं लागतं. त्यामुळे त्यांचा जेवणाचा डबाही शारीरिक आणि मानसिक वाढीच्या दृष्टीने परिपूर्ण असावा. मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरच्याघरी नवनवीन पदार्थ बनवून देता येऊ शकतात. मेथी किंवा कोबीचे पराठे, भाजणीचे, कांद्याचे पराठे, निरनिराळे सँडविच, तसेच मोड आलेल्या धान्याचे घिरडे मुलांच्या डब्यात दिल्यास मुलं सॉससोबत आवडीने खातात. बटाटा पोहा कटलेट, वाटाणा कटलेट तसेच विविध भाज्यांपासून बनवलेले कटलेट मुलांच्या डब्यात द्यावे. वाटलेल्या डाळीच्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या गोड किंवा तिखट पुऱ्या, नारळाची बर्फी, विविध प्रकारच्या चिक्की, डाळीचे तसेच रव्याचे लाडू, इडली, डोसा इत्यादी पदार्थ मुलांच्या डब्याला आलटून पालटून द्यावेत. मुलांच्या डब्यात पदार्थ देताना त्यात विविधता असेल याची काळजी घेतली तर मुलंही आवडीनं खातात आणि अनेक पौष्टिक घटक मुलांना मिळतात. परिणामी मुलांवर टॉनिक, व्हिटामिनच्या औषधांचा होणारा भडीमार टाळता येऊ शकतो.


डॉ. किर्ती ढोबळे, मानसरोवर, नवी मुंबई
dr.kirtidhobale@gmail.com



सपंर्क- 9222360448