रविवार, १४ ऑगस्ट, २०११

कशी करावी सांधेदुखीवर मात..?







सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात सुमारे दोनशेहून अधिक हाडं असतात आणि या सर्व हाडांना जोडणारे त्याहीपेक्षा जास्त सांधे असतात. आपल्या शरीराची पर्यायाने हाडांची हालचाल सांध्यांच्या सहाय्यानेच होत असते. म्हणूनच शरीराच्या हालचालींत सांध्यांच्या क्रीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हल्ली धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी वाढत चालल्याचं दिसून येतं. त्यामुळे सांध्यांची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा शेतकरी, माथाडी कामगार इत्यादी अतिश्रमाची कामं करणाऱ्या व्यक्तींचा सांधेदुखीचा त्रास तोंड वर काढतो. मात्र हल्ली कमी कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी असणाऱ्या महिला, ऑफिसात काम करणारे इतकच काय तर हल्ली शाळा-कॉलेजातील युवा पिढीलाही सांधेदुखीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

सांधेदुखीचा त्रास उद्भवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होणं. बळकटीसाठी हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. हाडांतील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यावर हाडांचा ठिसूळपणा आणि सच्छिद्रपणा वाढतो. परिणामी हाडांची झीज लवकर होते. स्त्रियांच्या बाळंतपणानंतर किंवा वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम संतुलित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण बाळंतपणानंतर आणि वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम कमी होण्याचा धोका जास्त असतो. मात्र कधीकधी अनुवंशिकतेतूनही सांधेदुखीचा त्रास मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येऊ शकतो. काही व्यक्तींच्या गूणसूत्रांतच (HLA B27 किंवा HLA DR4) दोष निर्माण होतो. परिणामी बऱ्याचदा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जीवाणू तसेच विषाणूंची बाधा झाल्याने संधीवाताचा आजार बळावू शकतो. त्यामुळे रक्ताची तपासणी केल्यावर संधीवाताच्या मुळाशी आपण पोहोचू शकतो.

रक्तातील युरिक आम्लाचे प्रमाण वाढल्यास किंवा प्रथिनांसारख्या विशिष्ट पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन झाल्यासही सांधेदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा हल्लीच्या धकाधकीच्या आणि सुपरफास्ट जीवनशैलीत कामाचा व्याप वाढून मानसिक तणाव निर्माण होतो. परिणामी खाण्यापिण्याच्या वेळा बदलणं, पचनासंदर्भातल्या समस्या निर्माण होणं या कारणांमुळेही संधीवाताच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे कित्येकदा अतिनील किरणांमुळे किंवा विशिष्ट प्रकारच्या होर्मोन्सची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे यामुळेही संधीवाताच्या तक्रारी वाढू शकतात. अतिमैदानी खेळ, अतिरक्तस्त्राव तसेच सांध्यांच्या ठिकाणी झालेली दुखापत यामुळेही सांधेदुखीचा त्रास बळावतो. एसी त्याचप्रमाणे थंड वातावरणातही सांध्यांचं दुखणं वाढू शकतं. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी एसीत जाणं शक्यतो टाळावं किंवा एसीत जाताना दुखणाऱ्या सांध्यांना उबदार कपड्यांनी झाकून मगच एसीत प्रवेश करावा.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वातप्रकोपक अन्नाचं सेवन जास्त केल्यास सांध्यांच्या त्रासात वाढ होऊ शकते. म्हणून सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मटकी, वाटाणा, तूर, हुलगे, हरभरा त्याचप्रमाणे चवळी इत्यादी कडधान्याचा आहारातील समावेश कमी करावा अन्यथा त्रास बरा होईपर्यंत पूर्णत: टाळावा. त्याचप्रमाणे इडली, डोसासारख्या आंबवलेल्या पदार्थांचंही सेवन करू नये. पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांचं सेवन टाळावं. अतिस्निग्ध तसेच तळलेले, तिखट पदार्थही जास्त प्रमाणात खाऊ नये. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी दही, ताक तसेच लोण्यासारख्या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करावं. अवेळी जेवण किंवा भूक नसताना खाण्याच्या सवयी जशा अनेक आजारांचं कारण बनतात तशाचं या सवयी संधीवातालाही आमंत्रण ठरतात. त्यामुळे वेळेवर आणि भूक असेल तेवढंच जेवण करणं गरजेचं असतं. कारण पित्त आणि गॅस निर्माण झाल्यास सांधेदुखीचा त्रास बळावण्याची भीती असते. अतिलंघन म्हणजेच उपवासही संधीवाताला निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे संधीवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी उपवास शक्यतो टाळावेत.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लघवी जास्त काळ तुंबून ठेवू नये. मल-मूत्र विसर्जन ही शरीराची नैसर्गिक आणि अपरिहार्य प्रक्रिया असल्याने ती वेळेवर करावी.

मानवी शरीरातील हाडांमध्ये एकप्रकारचा द्रव पदार्थ असतो. आपण जेव्हा हालचाली करतो तेव्हा हा द्रव पदार्थ हाडांमधील घर्षण कमी होण्यास मदत करतो. मात्र हाडांमधला द्रव पदार्थ कमी झाल्यास हाडांचं घर्षण जास्त प्रमाणात होऊन सांधेदुखीचा त्रास उद्भवतो किंवा दुर्लक्ष केल्यास हाडं ठिसूळ होऊन हाडांची मोठ्या प्रमाणात झीज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी रात्री झोपताना एरंड तेलाने दुखणाऱ्या सांध्याचं मालिश केल्यास फायदेशीर ठरतं. कारण एरंड तेलाने मालिश केल्यास विकृत वायू बाहेर पडून सांधदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. आहारात खारीक, खोबरे, दूध, ड्राय फ्रूट तसेच तुपाचा समावेश असावा. तसेच कॅल्शियम कमी झाल्याने सांधेदुखी वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्यात.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई (संपर्क- 9222360448)
Dr.kirtidhobale@gmail.com

रविवार, ७ ऑगस्ट, २०११

आला पावसाळा....आरोग्य सांभाळा..!





पहिला पाऊस मातीचा स्वर्गीय सुगंध देतो....उकाड्याने व्याकूळ झालेल्या जीवाला आल्हाददायक गारवा देतो. निसर्गाच्या नाना कला दाखवतो. डोंगर, दऱ्या, शेत-शिवाराला हिरवी झालर चढवतो पण चिंब कोसळून रान आबादानी करणारा पाऊस आपलं आरोग्यही आबादानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात वातावरण साधारणपणे आणि तुलनेने थंड असल्याने तसेच वातावरणात एकप्रकारचा ओलावा असल्याने योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यातच कामाधामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांना कित्येकदा पावसात भिजावं लागतं आणि त्यातच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली असते. रस्त्यांवरील खड्य़ांत, घराच्या छतावर, गॅलरीतल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये, अंगणातल्या सखल भागात पाणी साचून राहिल्याने त्या पाण्यावर डासांचं राज्य निर्माण होतं. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, काविळीसारख्या आजारांना आयतं आमंत्रण मिळतं. त्यामुळे खासकरून पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं.

आयुर्वेदात ऋतुचर्येचे आदानकाळ आणि विसर्गकाळ अशा दोन भागांत विभाजन केले आहे. आदानकाळातील शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतुत मनुष्यबळ उत्तरोत्तर तुलनेने क्षीण होत जाते. याच आदानकाळानंतर वर्षा ऋतूचे आगमन होते. त्यामुळे आधीच क्षीण झालेलं शरीर आणि मंदाग्नी यावर पावसाळ्यातील थंड हवेचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी वातदोष, पित्तदोष तोंड वर काढण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी, आम्लपित्त, अपचन, अरुची तसेच उदरशूल यांसारखे पचनसंस्थेचे आजार आणि दमा, सर्दी, खोकल्यासारखे श्वसनविकार जडण्याची भीती असते. हातापायांना चिखली, नायटा तसेच विविध बुरशीजन्य त्वचाविकारही जडण्याची शक्यता पावसाळ्यात जास्त असते.

वातदोष असणाऱ्यांनी थंड हवेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपताना तेलाने सांध्यांचं मालिश करावं. त्रासदायक व्यायाम तसेच सांध्यांवर ताण आणणारे योग टाळावेत.

पित्तदोष असणाऱ्यांनी पचायला हलकं जेवण घ्यावं. तसेच रात्री झोपताना दूध प्यावं. कमी मीठ असलेले आणि कमी तिखट पदार्थ खावेत. पित्तदोष असणाऱ्यांनी जागरण टाळावं. वेळी-अवेळी खाणं टाळावं. शिळं अन्न खाणंही टाळावं. शीतपेय, जंक फूड टाळावं. लिंबूपाणी, नारळपाणी वरचेवर घ्यावं.

त्वचाविकार होऊ नये म्हणून पावसाळ्यात भिजलेलं अंग त्वरित कोरडं करून घ्यावं, बाहेर पडताना पाय भिजू नयेत असे बूट घालावेत. चुकून बुटात पाणी शिरलंच तर त्वरित ते कोरडे करून मगच घालावेत. रात्री झोपताना खोबऱ्याचं तेल हातांना तसेच पायांना लावावं. ओले कपडे जास्तवेळ अंगावर ठेऊ नयेत.

अतिसार किंवा हगवण लागण्याचीही शक्यता पावसाळ्यात जास्त असते. अशावेळी दूध न घातलेल्या एक कप कोऱ्या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं. तासाभरात फरक पडतो. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून मीठ-साखर-पाण्याचं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतील. कडूनिंबाची पाने वाटून त्यात गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तीन्हींचा ताजा रस काढून सेवन करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सर्दी झाल्यास 2 कप पाण्यात तुळशीची 10 ते 12 पाने, थोडे आले, गुळ टाकून उकळून घ्यावं आणि गाळून घेऊन दिवसातून किमान दोनवेळा घ्यावं. तसेच मूठभर चिरलेला कोबी आणि वाटलेला कापूर उकळत्या पाण्यात टाकावा आणि नाक व तोंड उघडून वाफ घ्यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेतळ्यानं सर्दी कमी होण्यास मदत होते. कधीकधी सर्दी वाढल्याने कफ वाढून तो छातीत जाऊन साचतो. अशावेळी सूंठ किंवा वाळूची पुरचुंडी करून ती तव्यावर गरम करावी आणि छातीवर 5 ते 10 मिनीटं शेक द्यावा. त्यामुळे छातीत साचलेला कफ वितळण्यास मदत होते. सर्दी झाली असल्यास केळी, दही, ताक सेवन कमी करावं.

खोकला येत असल्यास चमचाभर आल्याचा रस तेवढ्याच मधात टाकून चाटण करावं. तसेच तुळशीच्या पानांचा आणि लवंग यांची काढा करून घ्यावा. तेलकट, थंड पदार्थ टाळावेत. तसेच रात्री झोपताना हळद टाकून गरम केलेलं दूध घ्यावं. लहान मुलांना खोकला येत असल्यास दुधात सूंठपूड, मिरे आणि हळद घालून द्यावं.


ताप आल्यास त्रिभूवन कीर्तीरस, अमृतारिष्ठ या आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा. पचायला जड अन्न टाळावं. मुगाची खिचडी, तांदळाची पेज, डाळ-भातासारखे हलके पदार्थ खावेत. ताप असलेल्या काळात दुधाचं सेवन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे तेलकट, तिखट पदार्थ तसेच मांसाहार पूर्ण वर्ज्य करावा. मिठाच्या पाण्यात कापड भिजवून अंग पुसून काढावं. मिठाच्या पाण्याने भिजवलेला रुमाल डोक्यावर ठेवावा. त्याचप्रमाणे डोक्याला हळद आणि चंदनाचा लेप द्यावा. दिवसभरात ताप न उतरल्यास तज्ज्ञ डॉक्टरला दाखवावं.


पावसाळ्यात नेहमी उकळलेलं पाणी प्यावं. घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. घराच्या परिसरातील आणि घरातल्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. त्याचप्रमाणे घरात भांड्यातल्या पाण्याचा साठा जास्त दिवस ठेऊ नये. डास घरात येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी लावून घ्यावी. रात्री उघडं झोपू नये. अंगावर घेऊनच झोपावं. घरातलं वातावरण उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा. मुळात पावसाळ्याचे दिवस हे सणवाराचे आणि वृतवैकल्याचे असल्याने खाण्याबाबत खूपवेळा बदल संभवत असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सणासुदीला चटकदार आणि मसालेदार पदार्थ कमी खावेत. त्याचप्रमाणे उपवासादिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ तसेच बटाट्याचे पदार्थ पचायला जड असल्याने असे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. उपवासादिवशी भगर, राजगिऱ्याचे लाडू, गूळ-शेंगदाणे, खजूर त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे खावीत. अशाप्रकारे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेतली तर हवाहवासा वाटणारा पावसाळा आपण मस्त एन्जॉय करू शकतो.


डॉ. कीर्ती ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई.
Dr.kirtidhobale@gmail.com
9222360448