शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

कानाचे आरोग्य आणि काळजी

‘कानाने बहिरा, मुका परि नाही’ कानाचे महत्त्व सांगण्यासाठी हा अभंग पुरेसा आहे. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे श्रवण आणि त्यामुळे इतरांशी संवाद अशक्य होतो. परिणामी व्यक्तीचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कान निष्क्रीय असतील तर चारी बाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटासारखी व्यक्तीची अवस्था होते. म्हणूनच कानाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हल्लीच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाने वेढलेल्या परिस्थितीत कानासारख्या इंद्रियांची काळजी क्रमप्राप्त ठरते. घामाच्या धारा वहायला लावणाऱ्या उन्हाळ्यासह थंडी आणि पावसाळ्यातही कानांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कानाची काळजी घेण्याबाबतच्या उपायांची माहिती आपण आज करून घेणार आहोत. मात्र त्याआधी कानाच्या रचनेचा गोषवारा आपण घेऊ.

कानात अडकवलेली डुलं आपल्याला मनमोहक वाटतात मात्र बाहेरून दिसणारा कान आतमध्येही खूप गहन असतो. मुख्यत: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण अशा तीन भागांत कानाचे वर्गीकरण केले जाते.
बाह्यकर्ण - बाह्यकर्णाची रचना बाहेर पसरट आणि आत नळीप्रमाणे अरुंद होत जाणारी असते. बाह्यकर्णाच्या
त्वचेतून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग कोमल, मऊ आणि नाजूक राहतो.
मध्यकर्ण - मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. जिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो आणि दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.
अंतर्कर्ण - अंतर्कर्ण म्हणजे हाडांच्या पोकळीतला नाजूक शंख. ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचवणे हे या शंखाचे मुख्य काम होय. अंतकर्णाचे दुसरे महत्त्वाचे शरीराचा तोल सांभाळणे.
अंतर्कर्णातील एका विशिष्ट भागात द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थात शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करणाऱ्या पेशी असतात. या पेशींची रचना आश्चर्यकारक असते. मात्र या पेशींमध्ये असंबंध हालचाली झाल्यास शरीराचा तोल जातो.
कानचे कार्य हे महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य निगा आणि काळजी घेण गरजेचं असतं. आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सजगता क्रमपाप्त ठरत असते. म्हणूनच आपण आज कानाची काळजी घेण्याबाबत जाणून घेणार आहोत.
सतत मोठ्या आवाजात काम करणं, फटाके, जास्त आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाईलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाईलचे इयरफोन कानाला लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडणे आदी गोष्टींमुळे कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी
होत जाते. श्रवणक्षमता कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्यानं बोलू लागते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करून घ्यावेत. सतत मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी. मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.

कानातला मळ काढण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. दोन ते तीन दिवस रात्री झोपताना कानात ग्लिसरीनचे दोन ते तीन थेंब टाकावेत किंवा दोन चमचे खोबरेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून लसून लाल होईपर्यंत गरम करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर कानात टाकावं. त्यामुळे कानातला मळ मऊ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कानात हायड्रोजन पेरॉक्साईडचे दोन थेंब टाकले तरी कानातला मळ मऊ होतो. मऊ झालेला मळ अलगद काढून घ्यावा. मात्र कित्येकदा कानातला मळ कडक होऊन तो निघेणासा होतो. अशावेळी जबरदस्तीने मळ काढण्यापेक्षा डॉक्टरांकडून काढणं फायदेशीर ठरतं. कानातला मळ कडक होऊन खडा होऊ नये म्हणून आपल्याकडे कानात रोज तेल घालण्याची पद्धत आहे. मात्र रोज तेल घालण्याच्या सवयीमुळे कानात बुरशी होऊन जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून पंधरा ते वीस दिवसांतूनन कानात तेल घालावं.कानात मळ साचणेही कानाच्या आरोग्याला अपायकारक असते. उन्हाळ्यात घामाचे पाणी कानात जाण्यामुळे, धुळीचे कण तसेच अंघोळ करताना साबण कानात जाण्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कानाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. तसेच कानातला मळ वरचेवर साफ करणंही आवश्यक असतं. मात्र कान साफ करताना कान कोरणे, काडेपेटीतील काडी वापरणं कानासाठी घातक ठरू शकतं. कान साफ करण्याच्या इशा साधनांमुळं कान बाहेर निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने पडद्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते.
म्हणून कानातला मळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातला मळ काढणाऱ्यांकडून मळ अजिबात काढू नये. कधी कधी कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखं वाटतं. अशावेळी हाताची बोटं, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यानं कानाला इजा पोहचून कानात रक्तस्त्राव होऊ शकतो.
पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातलं पाणी काढणं गरजेचं असतं. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणं गरजेचं असतं. कानात पाणी साचून राहिल्यानं कानात बुरशी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी. पावसाळ्यातही कानात पाणी जाऊन कान ओला राहतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कानाची विषेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कानाला मफलर किंवा उबदार कपडा बांधावा, कानात थंड हवा जाऊ न देण्याची काळजी घ्यावी. जोराचा वारा तसेच प्रवास करताना कानाला कपडा बांधावा. अशाप्रकारे कानांची काळजी घेतल्यास जगाला ऐकत राहण्यातला आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे

रविवार, १ जानेवारी, २०१२

नवरीचा मेकअप : त्वचा आणि केसांची काळजी

‘आली लग्न घटिका...समीप नवरा..’ अशा मंगलाष्टकांचे सूर कानावर पडू लागताच लग्नसराईची धामधूम सुरू झाली हे समजतं. ‘शुभमंगल सावधान’चा मंगलमयी सूर, विविध अत्तरं, फुलांचा स्वर्गीय सुगंध आणि रंगीबेरंगी अक्षतांचा पाऊस असं चित्र अख्ख्या लग्नसराईत ठिकठिकाणी दिसू लागतं. सनई, चौघडे वाजू लागतात, घर आंगण सजतं, वातावरण मांगल्यानं ओसंडून वाहतं, घरातल्या कच्च्या-बच्च्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. अबालवृद्धांची उत्साही लगबग आणि करवल्यांची धांदल उडते, वरबाप-वरमाईची लगबग सुरू होते आणि इकडे नवरीच्या कपड्या-दागिन्यांच्या खरेदीची झुंबड उडते. हातापायांवर मेंदीच्या सुरावटी उमटू लागतात. नखांवर विविध रंगछटांच्या नखपॉलिशचे थर चढू लागतात. लग्नसोहळ्यात सर्वांच्या औत्सुक्याचा आणि आकर्षणाचा विषय असते नवरी...म्हणूनच नवरीच्या मेकअपकडे खास लक्ष दिलं जातं. नवरीच्या मैत्रिणी, नणंदा-भावजया नवरीच्या सजावटीसाठी लगबगीनं पुढाकार घेतात. नवरीच्या मेकअपसाठी नवरीचा दादा मेकअपचं साहित्य बाजारातून आवर्जून आणतो. मात्र मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदाचा आधार घेतल्यास रासायनिक सौंदर्यसाधनांचा त्वचेवर तसेच केसांवर संभाव्य अपाय टाळणं सोपं जातं. लग्नाआधीच काही दिवस त्वचा आणि केसाची काळजी घेणं गरजेचं असतं, म्हणूनच लग्नात नवरी खुलून दिसण्यासाठी लग्नाआधी काळजी कशी घ्यावी आणि लग्नादिवशी नवरीच्या मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतींचा वापर कसा करावा हे आपण आज
पाहणार आहोत.

चेहऱ्याची काळजी- लग्नाआधी महिन्याभरापासून आपण चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकतो. चेहऱ्यावर काळे डाग तसेच पिंपल्स असतील तर आधी कोमठ पाण्याने चेहरा धुवावा आणि नीट कोरडा करावा. त्यानंतर एक चमचा दही घेऊन त्यात १ चमचा मसूरचं पीठ टाकून त्याची पेस्ट करुन चेहऱ्यावर
लावावं आणि सुमारे अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ क

रावा. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर कच्च्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा. दोन कप थंड दुधात एक चमचा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर आणि अर्धा चमचा आंबे हळद टाकून संपूर्ण चेहऱ्यावर लावावं आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे चेहरा चमकदार बनतो. चेहऱ्यावर पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं असेल तर फेशियलसाठी कोरफडाचा गर लावावा. कोरफडाचा गर लावल्यानं चेहऱ्यावर उत्तम फेशियल होतं. गव्हामध्ये चेहरा तजेलदार बनण्यासाठी आवश्यक ते व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे गव्हाचा कोंडा - दुधाची साय - दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप
चेहऱ्यावर लावावा. चेहरा तेलकट असेल तर एक चमचा मधात एक चमचा काकडीचा रस आणि तेवढाच संत्र्याचा रस एकत्र करून तयार झालेली घरगुती क्रीम चेहऱ्याला लावावी. 15 ते 20 मिनिटं ठेऊन चेहरा पुन्हा स्वच्छ करावा. त्याचप्रमाणे जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स तसेच डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर लावावे. कित्येकदा चेहऱ्यावरचे पिंपल्स गेल्यानंतरही त्यांचे डाग
चेहऱ्यावरचा

मुक्काम हलवत नाहीत. अशावेळी 15 दिवस दररोज टोमॅटोचा रस, काकडीचा रस, कोबीचा रस समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सचे डाग तातडीने नाहीसे होतात. पिंपल्सचे डाग नष्ट करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस-पुदिन्याचा रस-हळद एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावर टोमॅटोचा गर लावल्यानेही चेहऱ्याला चमक येते. चेहऱ्यावरील तसेच अंगावरील लव कमी करण्यासाठी पपिता पावड-नीमा पावडर-मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकावी आणि या मिश्रणात चार पट मसूर डाळीचे पातळ पीठ टाकून पाणी मिसळून त्याची पेस्ट लावावी. तसेच पिंपल्सचे प्रमाण कमी करण्यासाठी बाजरीच्या पीठाचा लेप चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी द्यावा. बाजरीच्या पीठाचा लेप 10 ते 15 मिनिटं ठेऊन कोमठ पाण्याने चेहरा धुवावा.
लग्नादिवशीचा मेकअप- महिनाभर केलेल्या घरगुती उपायांनी चेहऱ्याला एकप्रकारची लखाकी येते. मात्र लग्नादिवशी चेहऱ्यावर मेकअपचा तसेच रासायनिक सौंदर्यसाधनांचा अतिरेक झाल्यास चेहऱ्याच्या त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लग्नादिवशीचा मेकअप खूप काळजीपूर्वक करावा. लग्नाच्या आदल्या रात्री झोपताना चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटं बर्फ चोळावा नंतर चेहरा पुसून चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यानंतर चेहरा कोमठ पाण्याने साबणाचा वापर न करता स्वच्छ धुवून घ्यावा आणि कोरडा करून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून त्याचे छोटे काप करून त्याची मिक्सर किंवा वरवंट्याच्या सहाय्याने पेस्ट करावी. या पेस्टचा लेप चेहऱ्यावर 10 मिनिटं लावावा.
यामुळे चेहरा चांगला ब्लिच हेतो. त्यानंतर संत्री, मोसंबी किंवा साधारण आंबट फळांच्या गरात पिकलेली पपई किंवा केळी घालून चेहऱ्याचा मसाज करून कोमठ दुधात कापूस बुडवून चेहरा धुवून घ्यावा. लग्नादिवशी सकाळी उठल्यावर मुलतानी माती पाण्यात टाकून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि अर्ध्या तासानंतर
कोमठ पाण्यात थोडा रखरखीत स्पंज भिजवून चेहरा स्वच्छ करावा. अंघोळीपूर्वी चेहऱ्याला आणि हातापायांना खोबऱ्याचं तेल लावावं. लग्नादिवशी अंघोळीसाठी रासायनिक साबणाऐवजी दुधाचा वापर केलेला सौम्य साबण वापरावा. हल्ली लग्नात चेहऱ्याला फाऊंडेशन लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र फाऊंडेशनची निवड करताना आयुर्वेदिक फाऊंडेशनला प्राधान्य द्यावं. विवाह सोहळ्यात गर्दी आणि जास्त तीव्रतेच्या लाईट्सचा वापर केल्यामुळे घाम येऊन चेहऱ्यावरील फाऊंडेशनचं तेज कमी होतं. अशा वातावरणात फाऊंडेशनचं तेज जास्त काळ टिकण्यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी चेहऱ्याला बर्फ चोळल्यास फायदा होतो. फाऊंडेशन लावण्यासाठी हाताऐवजी स्पंजचा वापर करावा. तसेच त्वचेचा रंग सावळा असल्यास फाऊंडेशन कमी प्रमाणात लावावं, नाहीतर चेहरा पांढरट दिसू शकतो. ओठांना लिपस्टिक लावताना चेहऱ्याच्या रंगानुसार लिपस्टिकच्या रंगाची निवड करावी. लग्नात शक्यतो सौम्य रंगाचे लिपस्टिक वापरावे. कारण भडक रंगाच्या लिपस्टिकनं नवरीचं वय जास्त दिसण्याची शक्यता असते. साडी किंवा ड्रेसच्या रंगाला क्रॉस मॅचिंग होऊ नये याची काळजी घेऊनच लिपस्टिकचा रंग निवडावा. ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना आमसूल तेल लावावं आणि ओठ धुवून मगच लिपस्टिक लावावं. लिपस्टिक निवडताना ते ब्रँडेड कंपनीचं असावं
याची काळजी घ्यावी. हाताच्या कोपरांचा तसेच बोटांच्या सांध्यांवरील त्वचेचा काळसर रंग जाण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा मध आणि तेल टाकून हे मिश्रण कोपरांच्या तसेच बोटांच्या सांध्यांवरील काळसर रंगावर लावावं. लग्नात हळदीचा सोहळा असतो. हळदीचा सोहळा सूरु होण्याआधी चेहऱ्याला आणि अंगाला खोबऱ्याचं तेल लावावं म्हणजे नंतर हळद काढणं सोपं जातं. नाहीतर चेहरा पिवळसर दिसण्याची शक्यता असते.

केसांची काळजी- केस गळत असतील तर लग्नाआधीच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं. रोज रात्री जास्वंद तेलाने केसांची मसाज करावी. मध्यम आकाराचे सालीसकट डाळींब, जास्वंदाचं फूल, 10 ब्रम्हीची पाने 1 चमचा आवळ्याची पावडर, चार ते पाच मेंदीची पाने मिक्सरमधून बारीक करून तिळाच्या तेलात टाकावं आणि लोखंडाच्या कढईत मंद आचेवर उकळेपर्यंत उष्ण करून घ्यावं. ते कोमठ असतानाच बाटलीत भरून ठेवावं आणि हे मिश्रण रोज रात्री केसांना लावावं. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केस चमकदार दिसावेत आणि केसातला कोंडा कमी व्हावा म्हणून कोरफड जेलने केसांची मसाज करावी. केसांना साय किंवा लोणी लावावं आणि किमान अर्ध्या तासाने केस धुवून घेतल्यास केस चमकदार बनतात. केसांना साबण लावण्याऐवजी शिककाई पावडर किंवा रिट्याचा वापर करावा. केसांना रोज रात्री झोपताना तेल लावणं केसांच्या आरोग्याला फायदेशीर
असतं. केस धुताना साबणाऐवजी आयुर्वेदिक शॅम्पू वापरावा. अर्धा किलो मेंदी, 10 ते 12 शिककाई, आवळा चूर्ण, रिठा, बेहडा, त्रिफळा चूर्ण, माका, निमपावडर, नागरमोथा, लिंबाच्या रसाचे दोन ते तीन थेंब यांचे मिश्रण घेऊन 5 ते 6 तास कॉफी किंवा चहाच्या उकळलेल्या पाण्यात भिजवावे. व ते केसांना लावावं. जास्त चांगल्या परिणामांसाठी अशा मिश्रणात अंडे मिसळावे. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होते. अंघोळीनंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून त्याचा शेक केसांना द्यावा. केसांना चमकदार बनवण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात बसावं. आठवड्यातून किमान दोन वेळा कोमठ
तेलाने हेड मसाज करावा. लग्नात केसांना विविध प्रकारचे गजरे घालण्यासाठी किंवा ओढणी लावण्यासाठी पिन किंवा टाचण्यांचा वापर करतात त्यामुळे ते काढतानाही केस तुटू न देता काळजीपूर्वक काढणं गरजेचं असतं.

मेकअप कसा काढावा- लग्न सोहळ्यानंतर मेकअप काढतानाही खास काळजी घ्यावी लागते. मेकअप काढताना हातांऐवजी कापूस किंवा स्पंजचा वापर करावा. मेकअप काढण्यासाठी कोमठ पाण्याचाच वापर करावा. आधी ग्लिसरीन आणि खोबऱ्याचं तेल मिसळून चेहऱ्यावर लावावं नंतरच चेहऱ्यावरचा मेकअप कापूस किंवा स्पंजच्या साह्याने पुसून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी साबणाऐवजी आयुर्वेदिक फेस वॉशचा वापर करावा. त्यानंतर दूध, साय, लोणी, तूप मिसळून चेहऱ्याला लावावं. 10 ते 15 मिनिटं ठेऊन चेहरा स्वच्छ करावा.

अशाप्रकारे लग्नाआधी आणि लग्नादिवशी चेहरा आणि केसांची काळजी घेतल्यास गोड गोजिरी आणि लाज लाजिरी नवरी आणखी खुलून दिसते. त्याचप्रमाणे लग्नानंतर नवरीच्या त्वचा-केसांना होणारे संभाव्य अपाय आपण टाळू शकतो....शुभमंगल होत असताना त्वचा आणि केसांबाबत सावधान म्हणण्याची वेळ टाळता येऊ शकते.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई