रविवार, ४ मार्च, २०१२

डोळे हे जुलमी...काळजी आणि आहार

निसर्गानं माणसाला जे काही दिलंय ते भरभरून दिलंय. पण दातृत्वाची ओंजळ सदैव रिती करणारा निसर्ग आणि त्याच्या नाना कळा पाहायच्या असतील तर डोळे हवेतच, पण निसर्गाचं सर्वांगसुंदर रुप पाहण्यासाठी आवश्यक असणारे डोळेही दिलेत निसर्गानेच. नयनरम्य गोष्टींनी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाचं याचि देही याचि डोळा दर्शन आपल्याला करून देण्यात डोळ्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. सृष्टीला विविधांगी रंगछटांनी नखशिखांत तृप्त करून टाकणाऱ्या निसर्गाने माणसाला डोळेही किती विविधरंगी दिलेतपाहा ना..! घारे डोळे, काळेभोर डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, भुरे डोळे, हिरवट डोळे, राखडी डोळे अशा एक ना अनेक प्रकारचे डोळे निसर्गाने माणसाला दिले आहेत. मानवी मनात चाललेल्या घडामोडींचे निदर्शक म्हणून डोळेच भूमिका पार पाडतात. मनात चाललेला भावनांचा हलकल्लोळ डोळेच व्यक्त करतात. शब्देविण संवादूचा महामंत्र सांगणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनाही डोळ्यांच्या संवादाचीच महती सांगायची असावी असं वाटतं. समोरच्या व्यक्तीच्या मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर किंवा दया, माया, क्षमा आणि शांतीच्या भावना आपल्याला डोळ्यांमधूनच कळतात. आईच्या मातृत्वाची भावना, पित्याच्या पितृत्वाची जाणीवही आपल्याला शब्दांचा अर्थ न कळण्याच्या वयातच म्हणजे बालपणात त्यांच्या डोळ्यांमधूनच कळते. वासराला चाटणाऱ्या गाईच्या वात्सल्याचं दर्शनही आपल्याला गायीच्या पाणीदार डोळ्यांतून होतं. पिलाला घास भरवणाऱ्या चिमणीचं प्रेम तिच्या इवल्याशा लुकलुकणाऱ्या डोळ्यांतूनच दिसतं. डोळे ही मनाची खिडकी आहे. मानवी शरीरातील पाच इंद्रियांमध्ये डोळे या इंद्रियाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नाजूकपणाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या डोळ्यांची निगा काळजीपूर्वक राखणं गरजेचं असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांचे आरोग्य यावर आज आपण उहापोह करणार आहोत.

डोळ्यांचे रक्षण

मुळात डोळ्यांची रचनाच अशी आहे की, त्यांचे संरक्षण आपोआपच होत असते. कपाळ, गाल आणि नाक यांच्यामध्ये असलेल्या खोबणीत डोळे अगदी सुरक्षित असतात. भुवयांवर असलेल्या केसांमुळे तसेच पापण्यांवर असणाऱ्या केसांमुळे डोळ्यांचे धुलिकण तसेच उन्हापासून संरक्षण करतात. तरीही

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणखीही काही गोष्टी करणं आवश्यक असतं.

उन्हात फिरताना तसेच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. कडक उन्हात उष्णतेने डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून डोळे स्वच्छ पाण्याने चार ते पाच तासांनी धुवायला हवेत. तसेच डोळे पुसण्यासाठी मऊ, मुलायम कापडाचा किंवा रुमालाचा वापर करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळे पुसले तर उत्तमच. रात्री झोपताना डोळ्यांत स्वच्छ गुलाबपाणी टाकल्यास डोळ्यांना त्याचा फायदा होतो. तसेच गायीच्या तुपापासून बनवलेलं काजळही डोळ्यांना फायदेशीर ठरतं. हल्ली फॅशनच्या जगात डोळ्यांना लेन्स लावण्याचे प्रमाणही वाढले आहे. लेन्स लावताना तसेच काढताना हात स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावेत. तसेच लेन्स रोजच्यारोज स्वच्छ कराव्यात. लेन्स स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधं वापरावीत. लेन्स लावल्यानंतर डोळ्यांतून पाणी येऊ नये याची काळजी घ्यावी. कांदा कापताना, रडू कोसळल्यावर तसेच झोपताना लेन्स काढून ठेवाव्यात. लेन्स लावल्यानंतर गरम वातावरण तसेच वाफेपासून दूर राहावं.

हल्ली कामाच्या निमित्तानं संगणकासमोर तासनतास बसावं लागतं. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. संगणकासमोर सतत बसावं लागणाऱ्या व्यक्तींनी तसेच सतत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान दोन तासांनंतर डोळ्यांना आराम द्यावा. डोळे मिटून डोळ्यांवर थंड रुमाल ठेवावा. डोळे कोरडे पडले असतील तर डोळ्यात दोन ते तीन थेंब गुलाबपाणी टाकून 10 मिनीटं डोळे मिटून शांत पडावं. तसेच डोळे उघडताना एकदम न उघडता अलगद उघडावे. संगणकावर काम करताना संगणक आणि डोळ्यांमधलं अंतर किमान दोन फूट असावं. पुस्तक वाचतानाही पुस्तक आणि डोळ्यांमध्ये किमान दीड फूट अंतर असावं. टीव्ही पाहताना टीव्ही लांबूनच पाहावा. डोळ्यांना नंबरचा चष्मा असेल तर कोणतेही काम करताना चष्म्याचा वापर करावा अन्यथा नंहर वाढत जाऊन दृष्टीक्षमता कमी होण्याची भीती असते. प्रखर प्रकाशात, धुळीच्या ठिकाणी तसेच उन्हात जाताना किंवा दुचाकी चालवताना डोळ्यांना चांगल्या दर्जाचा गॉगल तसेच सनग्लास वापरावेत. दुसऱ्यांनी वापरलेला गॉगल किंवा सनग्लास वापरू नये.

रात्री झोपताना काश्याच्या वाटीने पायाला तेलाची मालिश केल्यास शांत झोप लागते आणि डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोक्याला मसाज केल्यानेही डोळ्यांना आराम मिळतो. आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले अंजन रोज रात्री डोळ्यांना लावावे त्यामुळे खाज, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे दुखणे अशा

त्रासापासून डोळ्यांचा बचाव करता येतो. तसेच एक चमचा त्रिफळादी धृत दिवसातून 2 वेळा घ्यावं. त्याचप्रमाणे एक चमचा त्रिफळादी चुर्ण रात्री झोपताना कोमठ पाण्यात टाकून घेतल्यास डोळ्याचे त्रास कमी होतात. || नासाही शिरसोव्दारम: | | या तत्वानुसार नाकातून एक ते दोन थेंब खोबऱ्याचे तेल सोडल्यानेही डोळ्यांना फायदा होतो.

डोळ्यांसाठी पोषक आहार

डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी तसेच डोळे शेवटपर्यंत कार्यक्षम राहण्यासाठी लहानपणापासूनच पोषक आहार गरजेचा असतो. पूरक तसेच पोषक आहार इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी ठेऊ शकतो. रोजचा आहार सर्व बाजूंनी समतोल असावा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी

जीवनसत्त्व तसेच प्रोटिनयुक्त पदार्थांची गरज असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आहारात पालक, मेथी, शेवगा, गाजर, मुळा, टोमॅटो इत्यादी भाज्यांचा समावेश असावा. चवळी, मूग, मटकीसारखी कडधान्ये तसेच सफरचंद, पपई, आंबा केळी, पेरूसारखी

फळंही डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शरीराला जीवनसत्त्व मिळावं म्हणून आहारात दूध, अंडी, मांस, मासे इत्यादींचाही समावेश असावा. मात्र शाकाहारी आहार शरीराला तसेत डोळ्यांना उपकारक असतो. पोट साफ राहावं म्हणून भरपूर पाणी प्यावं. आहारात सुकामेव्याचाही समावेश असावा. रोज सकाळी उपाशीपोटी दोन खजूर किंवा दोन खारीक किंवा दोन अंजीर दुधात भिजवून केलेलं सेवन डोळ्यांना फलदायी ठरतं. त्याचप्रमाणे सकाळी मूठभर काळे मनुके चावून खावेत. शेंगदाणा आणि गुळ तसेच राजगिऱ्याचे लाडूही वरचेवर खावेत.

डोळ्याच्या आजारांचा संसर्ग आणि काळजी

हल्ली प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोळे येण्याचं प्रमाण वाढत चाललय. डोळे येणं हा आजार मुळात संसर्गजन्य असल्याने खास काळजी घेणं

गरजेचं असतं. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेले काजळ, सुरमा तसेच सुरमा लावायची काडी, टॉवेल, रुमाल इत्यादी वस्तू दुसऱ्या व्यक्तींनी वापरल्यास त्यांनाही डोळे येण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

डोळ्यांचं आरोग्य आणि जीवनसत्त्वे

आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. मुख्यत्वेकरून डोळ्याच्या आरोग्यासाठी अ, , , आणि ड जीवनसत्त्वांची भूमिका महत्वाची असते. याच जीवनसत्वांविषयी....

अ :- मटण, चिकण, अंडी, दूध, गाजर, रताळी, मासे, केळी, खजूर, टोमॅटो, अंडयातील पिवळा भाग, यकृत, भाज्या, फळे, बिया, मांस, सोयाबीन

जीवनसत्त्वाच्या अभावामुळं रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. उत्तरोत्तर दृष्टी मंदावत जाते. वारंवार रांजणवाडी येते. डोळ्यांच्या पापण्या सूजतात, डोळ्यांना तसेच पापण्यांच्या कडांना खाज सुटते.

ब :- तृणधान्य, मोड आलेली कडधान्यं, अंडी, दूध तसेच दुधाचे पदार्थ, पालेभाज्या, हिरव्या भाज्या, यकृत, सोयाबीन

शरीरात जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाल्यास डोळ्यांची आग होते आणि डोळे लालसर होतात, दृष्टी दिवसेंदिवस कमी होते, तीव्र प्रकाश डोळ्यांना असह्य होतो.

क :- मोसंबी, संत्री, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या विविध भागांत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. शरीरातील जीवनस्तवाची कमतरता वेळेत भरून न काढल्यास वृद्धापकाळी मोतीबिंदू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

:- दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी, त्वचेवर पडणारे कोवळे सुर्यकिरण.

जीवनसत्त्वांच्या अभावामुळं मोतीबिंदू होण्याची जास्त शक्यता असते.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,

नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा