रविवार, ४ मार्च, २०१२

डोळे हे जुलमी...काळजी आणि आहार

निसर्गानं माणसाला जे काही दिलंय ते भरभरून दिलंय. पण दातृत्वाची ओंजळ सदैव रिती करणारा निसर्ग आणि त्याच्या नाना कळा पाहायच्या असतील तर डोळे हवेतच, पण निसर्गाचं सर्वांगसुंदर रुप पाहण्यासाठी आवश्यक असणारे डोळेही दिलेत निसर्गानेच. नयनरम्य गोष्टींनी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाचं याचि देही याचि डोळा दर्शन आपल्याला करून देण्यात डोळ्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. सृष्टीला विविधांगी रंगछटांनी नखशिखांत तृप्त करून टाकणाऱ्या निसर्गाने माणसाला डोळेही किती विविधरंगी दिलेतपाहा ना..! घारे डोळे, काळेभोर डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, भुरे डोळे, हिरवट डोळे, राखडी डोळे अशा एक ना अनेक प्रकारचे डोळे निसर्गाने माणसाला दिले आहेत. मानवी मनात चाललेल्या घडामोडींचे निदर्शक म्हणून डोळेच भूमिका पार पाडतात. मनात चाललेला भावनांचा हलकल्लोळ डोळेच व्यक्त करतात. शब्देविण संवादूचा महामंत्र सांगणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनाही डोळ्यांच्या संवादाचीच महती सांगायची असावी असं वाटतं. समोरच्या व्यक्तीच्या मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर किंवा दया, माया, क्षमा आणि शांतीच्या भावना आपल्याला डोळ्यांमधूनच कळतात. आईच्या मातृत्वाची भावना, पित्याच्या पितृत्वाची जाणीवही आपल्याला शब्दांचा अर्थ न कळण्याच्या वयातच म्हणजे बालपणात त्यांच्या डोळ्यांमधूनच कळते. वासराला चाटणाऱ्या गाईच्या वात्सल्याचं दर्शनही आपल्याला गायीच्या पाणीदार डोळ्यांतून होतं. पिलाला घास भरवणाऱ्या चिमणीचं प्रेम तिच्या इवल्याशा लुकलुकणाऱ्या डोळ्यांतूनच दिसतं. डोळे ही मनाची खिडकी आहे. मानवी शरीरातील पाच इंद्रियांमध्ये डोळे या इंद्रियाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नाजूकपणाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या डोळ्यांची निगा काळजीपूर्वक राखणं गरजेचं असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांचे आरोग्य यावर आज आपण उहापोह करणार आहोत.

डोळ्यांचे रक्षण

मुळात डोळ्यांची रचनाच अशी आहे की, त्यांचे संरक्षण आपोआपच होत असते. कपाळ, गाल आणि नाक यांच्यामध्ये असलेल्या खोबणीत डोळे अगदी सुरक्षित असतात. भुवयांवर असलेल्या केसांमुळे तसेच पापण्यांवर असणाऱ्या केसांमुळे डोळ्यांचे धुलिकण तसेच उन्हापासून संरक्षण करतात. तरीही

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणखीही काही गोष्टी करणं आवश्यक असतं.

उन्हात फिरताना तसेच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. कडक उन्हात उष्णतेने डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून डोळे स्वच्छ पाण्याने चार ते पाच तासांनी धुवायला हवेत. तसेच डोळे पुसण्यासाठी मऊ, मुलायम कापडाचा किंवा रुमालाचा वापर करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळे पुसले तर उत्तमच. रात्री झोपताना डोळ्यांत स्वच्छ गुलाबपाणी टाकल्यास डोळ्यांना त्याचा फायदा होतो. तसेच गायीच्या तुपापासून बनवलेलं काजळही डोळ्यांना फायदेशीर ठरतं. हल्ली फॅशनच्या जगात डोळ्यांना लेन्स लावण्याचे प्रमाणही वाढले आहे. लेन्स लावताना तसेच काढताना हात स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावेत. तसेच लेन्स रोजच्यारोज स्वच्छ कराव्यात. लेन्स स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधं वापरावीत. लेन्स लावल्यानंतर डोळ्यांतून पाणी येऊ नये याची काळजी घ्यावी. कांदा कापताना, रडू कोसळल्यावर तसेच झोपताना लेन्स काढून ठेवाव्यात. लेन्स लावल्यानंतर गरम वातावरण तसेच वाफेपासून दूर राहावं.

हल्ली कामाच्या निमित्तानं संगणकासमोर तासनतास बसावं लागतं. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. संगणकासमोर सतत बसावं लागणाऱ्या व्यक्तींनी तसेच सतत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान दोन तासांनंतर डोळ्यांना आराम द्यावा. डोळे मिटून डोळ्यांवर थंड रुमाल ठेवावा. डोळे कोरडे पडले असतील तर डोळ्यात दोन ते तीन थेंब गुलाबपाणी टाकून 10 मिनीटं डोळे मिटून शांत पडावं. तसेच डोळे उघडताना एकदम न उघडता अलगद उघडावे. संगणकावर काम करताना संगणक आणि डोळ्यांमधलं अंतर किमान दोन फूट असावं. पुस्तक वाचतानाही पुस्तक आणि डोळ्यांमध्ये किमान दीड फूट अंतर असावं. टीव्ही पाहताना टीव्ही लांबूनच पाहावा. डोळ्यांना नंबरचा चष्मा असेल तर कोणतेही काम करताना चष्म्याचा वापर करावा अन्यथा नंहर वाढत जाऊन दृष्टीक्षमता कमी होण्याची भीती असते. प्रखर प्रकाशात, धुळीच्या ठिकाणी तसेच उन्हात जाताना किंवा दुचाकी चालवताना डोळ्यांना चांगल्या दर्जाचा गॉगल तसेच सनग्लास वापरावेत. दुसऱ्यांनी वापरलेला गॉगल किंवा सनग्लास वापरू नये.

रात्री झोपताना काश्याच्या वाटीने पायाला तेलाची मालिश केल्यास शांत झोप लागते आणि डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोक्याला मसाज केल्यानेही डोळ्यांना आराम मिळतो. आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले अंजन रोज रात्री डोळ्यांना लावावे त्यामुळे खाज, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे दुखणे अशा

त्रासापासून डोळ्यांचा बचाव करता येतो. तसेच एक चमचा त्रिफळादी धृत दिवसातून 2 वेळा घ्यावं. त्याचप्रमाणे एक चमचा त्रिफळादी चुर्ण रात्री झोपताना कोमठ पाण्यात टाकून घेतल्यास डोळ्याचे त्रास कमी होतात. || नासाही शिरसोव्दारम: | | या तत्वानुसार नाकातून एक ते दोन थेंब खोबऱ्याचे तेल सोडल्यानेही डोळ्यांना फायदा होतो.

डोळ्यांसाठी पोषक आहार

डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी तसेच डोळे शेवटपर्यंत कार्यक्षम राहण्यासाठी लहानपणापासूनच पोषक आहार गरजेचा असतो. पूरक तसेच पोषक आहार इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी ठेऊ शकतो. रोजचा आहार सर्व बाजूंनी समतोल असावा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी

जीवनसत्त्व तसेच प्रोटिनयुक्त पदार्थांची गरज असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आहारात पालक, मेथी, शेवगा, गाजर, मुळा, टोमॅटो इत्यादी भाज्यांचा समावेश असावा. चवळी, मूग, मटकीसारखी कडधान्ये तसेच सफरचंद, पपई, आंबा केळी, पेरूसारखी

फळंही डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शरीराला जीवनसत्त्व मिळावं म्हणून आहारात दूध, अंडी, मांस, मासे इत्यादींचाही समावेश असावा. मात्र शाकाहारी आहार शरीराला तसेत डोळ्यांना उपकारक असतो. पोट साफ राहावं म्हणून भरपूर पाणी प्यावं. आहारात सुकामेव्याचाही समावेश असावा. रोज सकाळी उपाशीपोटी दोन खजूर किंवा दोन खारीक किंवा दोन अंजीर दुधात भिजवून केलेलं सेवन डोळ्यांना फलदायी ठरतं. त्याचप्रमाणे सकाळी मूठभर काळे मनुके चावून खावेत. शेंगदाणा आणि गुळ तसेच राजगिऱ्याचे लाडूही वरचेवर खावेत.

डोळ्याच्या आजारांचा संसर्ग आणि काळजी

हल्ली प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोळे येण्याचं प्रमाण वाढत चाललय. डोळे येणं हा आजार मुळात संसर्गजन्य असल्याने खास काळजी घेणं

गरजेचं असतं. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेले काजळ, सुरमा तसेच सुरमा लावायची काडी, टॉवेल, रुमाल इत्यादी वस्तू दुसऱ्या व्यक्तींनी वापरल्यास त्यांनाही डोळे येण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

डोळ्यांचं आरोग्य आणि जीवनसत्त्वे

आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. मुख्यत्वेकरून डोळ्याच्या आरोग्यासाठी अ, , , आणि ड जीवनसत्त्वांची भूमिका महत्वाची असते. याच जीवनसत्वांविषयी....

अ :- मटण, चिकण, अंडी, दूध, गाजर, रताळी, मासे, केळी, खजूर, टोमॅटो, अंडयातील पिवळा भाग, यकृत, भाज्या, फळे, बिया, मांस, सोयाबीन

जीवनसत्त्वाच्या अभावामुळं रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. उत्तरोत्तर दृष्टी मंदावत जाते. वारंवार रांजणवाडी येते. डोळ्यांच्या पापण्या सूजतात, डोळ्यांना तसेच पापण्यांच्या कडांना खाज सुटते.

ब :- तृणधान्य, मोड आलेली कडधान्यं, अंडी, दूध तसेच दुधाचे पदार्थ, पालेभाज्या, हिरव्या भाज्या, यकृत, सोयाबीन

शरीरात जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाल्यास डोळ्यांची आग होते आणि डोळे लालसर होतात, दृष्टी दिवसेंदिवस कमी होते, तीव्र प्रकाश डोळ्यांना असह्य होतो.

क :- मोसंबी, संत्री, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या विविध भागांत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. शरीरातील जीवनस्तवाची कमतरता वेळेत भरून न काढल्यास वृद्धापकाळी मोतीबिंदू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

:- दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी, त्वचेवर पडणारे कोवळे सुर्यकिरण.

जीवनसत्त्वांच्या अभावामुळं मोतीबिंदू होण्याची जास्त शक्यता असते.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,

नवी मुंबई

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

कानाचे आरोग्य आणि काळजी

‘कानाने बहिरा, मुका परि नाही’ कानाचे महत्त्व सांगण्यासाठी हा अभंग पुरेसा आहे. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे श्रवण आणि त्यामुळे इतरांशी संवाद अशक्य होतो. परिणामी व्यक्तीचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कान निष्क्रीय असतील तर चारी बाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटासारखी व्यक्तीची अवस्था होते. म्हणूनच कानाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हल्लीच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाने वेढलेल्या परिस्थितीत कानासारख्या इंद्रियांची काळजी क्रमप्राप्त ठरते. घामाच्या धारा वहायला लावणाऱ्या उन्हाळ्यासह थंडी आणि पावसाळ्यातही कानांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कानाची काळजी घेण्याबाबतच्या उपायांची माहिती आपण आज करून घेणार आहोत. मात्र त्याआधी कानाच्या रचनेचा गोषवारा आपण घेऊ.

कानात अडकवलेली डुलं आपल्याला मनमोहक वाटतात मात्र बाहेरून दिसणारा कान आतमध्येही खूप गहन असतो. मुख्यत: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण अशा तीन भागांत कानाचे वर्गीकरण केले जाते.
बाह्यकर्ण - बाह्यकर्णाची रचना बाहेर पसरट आणि आत नळीप्रमाणे अरुंद होत जाणारी असते. बाह्यकर्णाच्या
त्वचेतून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग कोमल, मऊ आणि नाजूक राहतो.
मध्यकर्ण - मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. जिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो आणि दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.
अंतर्कर्ण - अंतर्कर्ण म्हणजे हाडांच्या पोकळीतला नाजूक शंख. ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचवणे हे या शंखाचे मुख्य काम होय. अंतकर्णाचे दुसरे महत्त्वाचे शरीराचा तोल सांभाळणे.
अंतर्कर्णातील एका विशिष्ट भागात द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थात शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करणाऱ्या पेशी असतात. या पेशींची रचना आश्चर्यकारक असते. मात्र या पेशींमध्ये असंबंध हालचाली झाल्यास शरीराचा तोल जातो.
कानचे कार्य हे महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य निगा आणि काळजी घेण गरजेचं असतं. आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सजगता क्रमपाप्त ठरत असते. म्हणूनच आपण आज कानाची काळजी घेण्याबाबत जाणून घेणार आहोत.
सतत मोठ्या आवाजात काम करणं, फटाके, जास्त आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाईलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाईलचे इयरफोन कानाला लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडणे आदी गोष्टींमुळे कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी
होत जाते. श्रवणक्षमता कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्यानं बोलू लागते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करून घ्यावेत. सतत मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी. मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.

कानातला मळ काढण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. दोन ते तीन दिवस रात्री झोपताना कानात ग्लिसरीनचे दोन ते तीन थेंब टाकावेत किंवा दोन चमचे खोबरेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून लसून लाल होईपर्यंत गरम करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर कानात टाकावं. त्यामुळे कानातला मळ मऊ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कानात हायड्रोजन पेरॉक्साईडचे दोन थेंब टाकले तरी कानातला मळ मऊ होतो. मऊ झालेला मळ अलगद काढून घ्यावा. मात्र कित्येकदा कानातला मळ कडक होऊन तो निघेणासा होतो. अशावेळी जबरदस्तीने मळ काढण्यापेक्षा डॉक्टरांकडून काढणं फायदेशीर ठरतं. कानातला मळ कडक होऊन खडा होऊ नये म्हणून आपल्याकडे कानात रोज तेल घालण्याची पद्धत आहे. मात्र रोज तेल घालण्याच्या सवयीमुळे कानात बुरशी होऊन जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून पंधरा ते वीस दिवसांतूनन कानात तेल घालावं.कानात मळ साचणेही कानाच्या आरोग्याला अपायकारक असते. उन्हाळ्यात घामाचे पाणी कानात जाण्यामुळे, धुळीचे कण तसेच अंघोळ करताना साबण कानात जाण्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कानाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. तसेच कानातला मळ वरचेवर साफ करणंही आवश्यक असतं. मात्र कान साफ करताना कान कोरणे, काडेपेटीतील काडी वापरणं कानासाठी घातक ठरू शकतं. कान साफ करण्याच्या इशा साधनांमुळं कान बाहेर निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने पडद्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते.
म्हणून कानातला मळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातला मळ काढणाऱ्यांकडून मळ अजिबात काढू नये. कधी कधी कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखं वाटतं. अशावेळी हाताची बोटं, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यानं कानाला इजा पोहचून कानात रक्तस्त्राव होऊ शकतो.
पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातलं पाणी काढणं गरजेचं असतं. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणं गरजेचं असतं. कानात पाणी साचून राहिल्यानं कानात बुरशी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी. पावसाळ्यातही कानात पाणी जाऊन कान ओला राहतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कानाची विषेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कानाला मफलर किंवा उबदार कपडा बांधावा, कानात थंड हवा जाऊ न देण्याची काळजी घ्यावी. जोराचा वारा तसेच प्रवास करताना कानाला कपडा बांधावा. अशाप्रकारे कानांची काळजी घेतल्यास जगाला ऐकत राहण्यातला आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे

रविवार, १ जानेवारी, २०१२

नवरीचा मेकअप : त्वचा आणि केसांची काळजी

‘आली लग्न घटिका...समीप नवरा..’ अशा मंगलाष्टकांचे सूर कानावर पडू लागताच लग्नसराईची धामधूम सुरू झाली हे समजतं. ‘शुभमंगल सावधान’चा मंगलमयी सूर, विविध अत्तरं, फुलांचा स्वर्गीय सुगंध आणि रंगीबेरंगी अक्षतांचा पाऊस असं चित्र अख्ख्या लग्नसराईत ठिकठिकाणी दिसू लागतं. सनई, चौघडे वाजू लागतात, घर आंगण सजतं, वातावरण मांगल्यानं ओसंडून वाहतं, घरातल्या कच्च्या-बच्च्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. अबालवृद्धांची उत्साही लगबग आणि करवल्यांची धांदल उडते, वरबाप-वरमाईची लगबग सुरू होते आणि इकडे नवरीच्या कपड्या-दागिन्यांच्या खरेदीची झुंबड उडते. हातापायांवर मेंदीच्या सुरावटी उमटू लागतात. नखांवर विविध रंगछटांच्या नखपॉलिशचे थर चढू लागतात. लग्नसोहळ्यात सर्वांच्या औत्सुक्याचा आणि आकर्षणाचा विषय असते नवरी...म्हणूनच नवरीच्या मेकअपकडे खास लक्ष दिलं जातं. नवरीच्या मैत्रिणी, नणंदा-भावजया नवरीच्या सजावटीसाठी लगबगीनं पुढाकार घेतात. नवरीच्या मेकअपसाठी नवरीचा दादा मेकअपचं साहित्य बाजारातून आवर्जून आणतो. मात्र मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदाचा आधार घेतल्यास रासायनिक सौंदर्यसाधनांचा त्वचेवर तसेच केसांवर संभाव्य अपाय टाळणं सोपं जातं. लग्नाआधीच काही दिवस त्वचा आणि केसाची काळजी घेणं गरजेचं असतं, म्हणूनच लग्नात नवरी खुलून दिसण्यासाठी लग्नाआधी काळजी कशी घ्यावी आणि लग्नादिवशी नवरीच्या मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतींचा वापर कसा करावा हे आपण आज
पाहणार आहोत.

चेहऱ्याची काळजी- लग्नाआधी महिन्याभरापासून आपण चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकतो. चेहऱ्यावर काळे डाग तसेच पिंपल्स असतील तर आधी कोमठ पाण्याने चेहरा धुवावा आणि नीट कोरडा करावा. त्यानंतर एक चमचा दही घेऊन त्यात १ चमचा मसूरचं पीठ टाकून त्याची पेस्ट करुन चेहऱ्यावर
लावावं आणि सुमारे अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ क

रावा. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर कच्च्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा. दोन कप थंड दुधात एक चमचा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर आणि अर्धा चमचा आंबे हळद टाकून संपूर्ण चेहऱ्यावर लावावं आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे चेहरा चमकदार बनतो. चेहऱ्यावर पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं असेल तर फेशियलसाठी कोरफडाचा गर लावावा. कोरफडाचा गर लावल्यानं चेहऱ्यावर उत्तम फेशियल होतं. गव्हामध्ये चेहरा तजेलदार बनण्यासाठी आवश्यक ते व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे गव्हाचा कोंडा - दुधाची साय - दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप
चेहऱ्यावर लावावा. चेहरा तेलकट असेल तर एक चमचा मधात एक चमचा काकडीचा रस आणि तेवढाच संत्र्याचा रस एकत्र करून तयार झालेली घरगुती क्रीम चेहऱ्याला लावावी. 15 ते 20 मिनिटं ठेऊन चेहरा पुन्हा स्वच्छ करावा. त्याचप्रमाणे जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स तसेच डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर लावावे. कित्येकदा चेहऱ्यावरचे पिंपल्स गेल्यानंतरही त्यांचे डाग
चेहऱ्यावरचा

मुक्काम हलवत नाहीत. अशावेळी 15 दिवस दररोज टोमॅटोचा रस, काकडीचा रस, कोबीचा रस समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सचे डाग तातडीने नाहीसे होतात. पिंपल्सचे डाग नष्ट करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस-पुदिन्याचा रस-हळद एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावर टोमॅटोचा गर लावल्यानेही चेहऱ्याला चमक येते. चेहऱ्यावरील तसेच अंगावरील लव कमी करण्यासाठी पपिता पावड-नीमा पावडर-मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकावी आणि या मिश्रणात चार पट मसूर डाळीचे पातळ पीठ टाकून पाणी मिसळून त्याची पेस्ट लावावी. तसेच पिंपल्सचे प्रमाण कमी करण्यासाठी बाजरीच्या पीठाचा लेप चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी द्यावा. बाजरीच्या पीठाचा लेप 10 ते 15 मिनिटं ठेऊन कोमठ पाण्याने चेहरा धुवावा.
लग्नादिवशीचा मेकअप- महिनाभर केलेल्या घरगुती उपायांनी चेहऱ्याला एकप्रकारची लखाकी येते. मात्र लग्नादिवशी चेहऱ्यावर मेकअपचा तसेच रासायनिक सौंदर्यसाधनांचा अतिरेक झाल्यास चेहऱ्याच्या त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लग्नादिवशीचा मेकअप खूप काळजीपूर्वक करावा. लग्नाच्या आदल्या रात्री झोपताना चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटं बर्फ चोळावा नंतर चेहरा पुसून चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यानंतर चेहरा कोमठ पाण्याने साबणाचा वापर न करता स्वच्छ धुवून घ्यावा आणि कोरडा करून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून त्याचे छोटे काप करून त्याची मिक्सर किंवा वरवंट्याच्या सहाय्याने पेस्ट करावी. या पेस्टचा लेप चेहऱ्यावर 10 मिनिटं लावावा.
यामुळे चेहरा चांगला ब्लिच हेतो. त्यानंतर संत्री, मोसंबी किंवा साधारण आंबट फळांच्या गरात पिकलेली पपई किंवा केळी घालून चेहऱ्याचा मसाज करून कोमठ दुधात कापूस बुडवून चेहरा धुवून घ्यावा. लग्नादिवशी सकाळी उठल्यावर मुलतानी माती पाण्यात टाकून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि अर्ध्या तासानंतर
कोमठ पाण्यात थोडा रखरखीत स्पंज भिजवून चेहरा स्वच्छ करावा. अंघोळीपूर्वी चेहऱ्याला आणि हातापायांना खोबऱ्याचं तेल लावावं. लग्नादिवशी अंघोळीसाठी रासायनिक साबणाऐवजी दुधाचा वापर केलेला सौम्य साबण वापरावा. हल्ली लग्नात चेहऱ्याला फाऊंडेशन लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र फाऊंडेशनची निवड करताना आयुर्वेदिक फाऊंडेशनला प्राधान्य द्यावं. विवाह सोहळ्यात गर्दी आणि जास्त तीव्रतेच्या लाईट्सचा वापर केल्यामुळे घाम येऊन चेहऱ्यावरील फाऊंडेशनचं तेज कमी होतं. अशा वातावरणात फाऊंडेशनचं तेज जास्त काळ टिकण्यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी चेहऱ्याला बर्फ चोळल्यास फायदा होतो. फाऊंडेशन लावण्यासाठी हाताऐवजी स्पंजचा वापर करावा. तसेच त्वचेचा रंग सावळा असल्यास फाऊंडेशन कमी प्रमाणात लावावं, नाहीतर चेहरा पांढरट दिसू शकतो. ओठांना लिपस्टिक लावताना चेहऱ्याच्या रंगानुसार लिपस्टिकच्या रंगाची निवड करावी. लग्नात शक्यतो सौम्य रंगाचे लिपस्टिक वापरावे. कारण भडक रंगाच्या लिपस्टिकनं नवरीचं वय जास्त दिसण्याची शक्यता असते. साडी किंवा ड्रेसच्या रंगाला क्रॉस मॅचिंग होऊ नये याची काळजी घेऊनच लिपस्टिकचा रंग निवडावा. ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना आमसूल तेल लावावं आणि ओठ धुवून मगच लिपस्टिक लावावं. लिपस्टिक निवडताना ते ब्रँडेड कंपनीचं असावं
याची काळजी घ्यावी. हाताच्या कोपरांचा तसेच बोटांच्या सांध्यांवरील त्वचेचा काळसर रंग जाण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा मध आणि तेल टाकून हे मिश्रण कोपरांच्या तसेच बोटांच्या सांध्यांवरील काळसर रंगावर लावावं. लग्नात हळदीचा सोहळा असतो. हळदीचा सोहळा सूरु होण्याआधी चेहऱ्याला आणि अंगाला खोबऱ्याचं तेल लावावं म्हणजे नंतर हळद काढणं सोपं जातं. नाहीतर चेहरा पिवळसर दिसण्याची शक्यता असते.

केसांची काळजी- केस गळत असतील तर लग्नाआधीच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं. रोज रात्री जास्वंद तेलाने केसांची मसाज करावी. मध्यम आकाराचे सालीसकट डाळींब, जास्वंदाचं फूल, 10 ब्रम्हीची पाने 1 चमचा आवळ्याची पावडर, चार ते पाच मेंदीची पाने मिक्सरमधून बारीक करून तिळाच्या तेलात टाकावं आणि लोखंडाच्या कढईत मंद आचेवर उकळेपर्यंत उष्ण करून घ्यावं. ते कोमठ असतानाच बाटलीत भरून ठेवावं आणि हे मिश्रण रोज रात्री केसांना लावावं. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केस चमकदार दिसावेत आणि केसातला कोंडा कमी व्हावा म्हणून कोरफड जेलने केसांची मसाज करावी. केसांना साय किंवा लोणी लावावं आणि किमान अर्ध्या तासाने केस धुवून घेतल्यास केस चमकदार बनतात. केसांना साबण लावण्याऐवजी शिककाई पावडर किंवा रिट्याचा वापर करावा. केसांना रोज रात्री झोपताना तेल लावणं केसांच्या आरोग्याला फायदेशीर
असतं. केस धुताना साबणाऐवजी आयुर्वेदिक शॅम्पू वापरावा. अर्धा किलो मेंदी, 10 ते 12 शिककाई, आवळा चूर्ण, रिठा, बेहडा, त्रिफळा चूर्ण, माका, निमपावडर, नागरमोथा, लिंबाच्या रसाचे दोन ते तीन थेंब यांचे मिश्रण घेऊन 5 ते 6 तास कॉफी किंवा चहाच्या उकळलेल्या पाण्यात भिजवावे. व ते केसांना लावावं. जास्त चांगल्या परिणामांसाठी अशा मिश्रणात अंडे मिसळावे. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होते. अंघोळीनंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून त्याचा शेक केसांना द्यावा. केसांना चमकदार बनवण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात बसावं. आठवड्यातून किमान दोन वेळा कोमठ
तेलाने हेड मसाज करावा. लग्नात केसांना विविध प्रकारचे गजरे घालण्यासाठी किंवा ओढणी लावण्यासाठी पिन किंवा टाचण्यांचा वापर करतात त्यामुळे ते काढतानाही केस तुटू न देता काळजीपूर्वक काढणं गरजेचं असतं.

मेकअप कसा काढावा- लग्न सोहळ्यानंतर मेकअप काढतानाही खास काळजी घ्यावी लागते. मेकअप काढताना हातांऐवजी कापूस किंवा स्पंजचा वापर करावा. मेकअप काढण्यासाठी कोमठ पाण्याचाच वापर करावा. आधी ग्लिसरीन आणि खोबऱ्याचं तेल मिसळून चेहऱ्यावर लावावं नंतरच चेहऱ्यावरचा मेकअप कापूस किंवा स्पंजच्या साह्याने पुसून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी साबणाऐवजी आयुर्वेदिक फेस वॉशचा वापर करावा. त्यानंतर दूध, साय, लोणी, तूप मिसळून चेहऱ्याला लावावं. 10 ते 15 मिनिटं ठेऊन चेहरा स्वच्छ करावा.

अशाप्रकारे लग्नाआधी आणि लग्नादिवशी चेहरा आणि केसांची काळजी घेतल्यास गोड गोजिरी आणि लाज लाजिरी नवरी आणखी खुलून दिसते. त्याचप्रमाणे लग्नानंतर नवरीच्या त्वचा-केसांना होणारे संभाव्य अपाय आपण टाळू शकतो....शुभमंगल होत असताना त्वचा आणि केसांबाबत सावधान म्हणण्याची वेळ टाळता येऊ शकते.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

आजारांची वर्दी...त्रासदायक सर्दी

वातावरणातील सततच्या बदलांनी, सततच्या प्रवासाने तसेच अचानक आहार-विहारात घडलेल्या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर पहिला हल्ला सर्दी करते. सर्दीचा त्रास सुरू झाला की आपोआपच डोकेदुखी तसेच कित्येकदा
खोकल्याचा त्रासही डोकं वर काढतो. मुळात सर्दी ही अनेक आजारांची जननी समजली जाते. त्याचप्रमाणे तापासारख्या अनेक आजारांची वर्दी म्हणजे पूर्वसूचनाही सर्दीच देते. सर्दीचा हा मुख्यत्वेकरून हिवाळ्यात उद्भवनारा आजार समजला जातो. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.


आधी पातळ असलेली सर्दी उत्तरोत्तर घट्ट होत जाते. सर्दी पडशात बारीक ताप येण्याचीही शक्यता असते. नाक बंद होऊन लालसर होते, घसा खवखवतो तसेच घशात खाजल्यासारखे होते. सर्दी झाल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास थकवा जाणवतो आणि जास्त दिवस सर्दी तशीच राहिली तर अशक्तपणा वाढत जातो. नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्यानं नाकातून कानाकडे पोहोचणाऱ्या कानाघ नलिकेचे तोंड बंद होण्याची शक्यता असते. कानाघ नलिकेचे तोंड ब्लॉक झाल्याने कानात विशिष्ट संवेदना होणेमुळात सर्दी-पडसे एका विशिष्ट जातीच्या विषाणूंमुळे होते. कधीकधी सर्दी संसर्गामुळेही होऊ शकते. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि कित्येकदा नाकाच्या आतील त्वचेला सूज येते. नाकातून पाणी वाहू लागते. सर्दी झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात नाकातले पाणी पांढरे तसेच पातळ स्वरुपाचे असते.
किंवा कानात गच्चपणा जाणवतो तसेच कानाचे दडेही बसतात.

संसर्गातून झालेली सर्दी दोन-तीन दिवसांत आपोआप बरी होते मात्र अशा सर्दीत थंड पदार्थ वर्ज्य करत खाण्यापिण्याच्या सवयीत प्राथमिक बदल करणे गरजेचं असतं. सर्दी झाल्यावर प्राथमिक उपाययोजना म्हणून भरपूर कोमठ पाणी प्यावं. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात कोबी टाकून त्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना कापूर ठेचून गरम पाण्यात टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच पूर्णपणे विश्रांती घ्यावी. थंड वातावरणापासून दूर राहावं. शक्यतो एसीत जाणं टाळावं. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावं. उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी. घरातलं वातावरण उबदार ठेवावं. शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.

घट्ट झालेली सर्दी नाकपुड्यात साचून राहिल्याने नाक चोंदते आणि श्वसनाला त्रास होतो. नंतर डोकेदुखी सुरू होते. त्याचप्रमाणे घट्ट झालेली सर्दी जास्त काळ राहिल्यास छातीत कफ साचतो आणि खोकला डोकं वर काढतो. खोकला जास्त काळ राहिल्यास फुफुसाचे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकल्यावर त्वरीत इपचार
करणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा खोकल्याचं मूळ टीबीसारख्या आजारातही असतं. त्यामुळे खोकला जास्त काळ टिकल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. धुम्रपान, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. दही, तुप तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. आहार गरम असेल याची काळजी घ्यावी. विविध प्रकारचे सूप सर्दी आणि खोकल्यावर गूणकारी ठरतात. सर्दी आणि खोकल्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपायही करता येतात. मात्र घरगुती उपाय करूनही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

1) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.
2) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.
3) एक चमचा मधात चिमूटभर पांढऱ्या मिरीचं चूर्ण टाकून नीट घोटून आठवडाभर दिवसातून चार ते पाचवेळा घ्यावं.
4) काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं.

5) सुंठ आणि काळी मिरी पावडर मधात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो
6) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकल्यापासून सुटका मिळू शकते
7) हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे.
8) मध आणि आवळा पावडर यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
9) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, एक चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
नवी मुंबई

रविवार, ११ डिसेंबर, २०११

अतिसार : कारणं आणि उपाय

|| गुदेन बहुद्रवसरण अतिसार: || पोटात गेलेल्या अन्नाचं पचन होऊन आणि अंतर्पोटातील विविध क्रिया होऊन अतिद्रव मलाचे अतिसरण म्हणजेच अतिसार किंवा हगवण होय. सुदृढ आणि निर्दोष निरोगी जीवनासाठी योग्य पोषणमूल्य असणारे अन्न पोटात जाणं जितकं गरजेचं असतं तसंच त्याचं निस:रण होणंही तितकच आवश्यक असतं. दिवसातून कितीवेळा अन्नग्रहण व्हावं याचं जसं प्रमाण ठरलेलं असतं तसंच मलनिस:रणही दिवसातून किती वेळा व्हायला पाहिजे याचंही प्रमाण ठरलेलं असतं म्हणूनच आयुर्वेदानुसार अथवा जीवशास्त्रानुसार शौचास जाण्याच्या प्रमाणात अचानक वाढ होणं किंवा अचानक कमी होणं ही व्याधी समजली जाते. प्रौढांमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा शौचास होणं स्वाभाविक असतं. मात्र शौचास होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास अतिसार झाला असं म्हंटलं जातं. लहान बालकांना दिवसातून सर्वसाधारणपणे 7 ते 8 वेळा पातळ,

चिकट, दुर्गंधीयुक्त मलाचे निस्सरण झाल्यास त्याला अतिसार झाला असल्याचं मानावं. पोटात गेलेल्या अन्नातील स्निग्ध पदार्थ पचवून शरीराकडून पोषणमूल्यांचं शोषण होण्याची क्रिया बिघडल्यास वारंवार चिकट व दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. अनेकदा अतिसाराचा आजार मानसिक कारणांतही दडलेला असतो. अतिशोक, तणाव, भयग्रस्तता यांमुळेही वारंवार शौचाला होते. एका अहवालानुसार जगात वर्षाकाठी अतिसारामुळे
व कुपोषणाद्वारे 10 लक्ष मुले मृत्युच्या खाईत लोटली जातात. अतिसारामुळे मृत्यू येणाऱ्यांमध्ये प्रौढांपेक्षा

लहान मुलांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे कारण लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होतं. अतिसार झालेल्या 200 मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाल्याचं एका पाहणीत निष्पन्न झालंय. मात्र फक्त आईचं दूध पिणाऱ्या मुलांना क्वचितच अतिसाराचा त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांना ठराविक वयापर्यंत फक्त आईचं दूध
पाजणं अत्यंत गरजेचं असतं.
मैदा, बेसनाचे पदार्थ, वडापाव, समोसा, लोणी, चीज, पनीर, पिझ्झा, बर्गर, उत्तपा, डोसा, तसेच चायनिज यांसारख्या पचायला जड पदार्थांच्या वारंवार अतिसेवनाने अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे आईस्क्रीम, शितपेयं,बियरसारख्या अतिथंड पदार्थांच्या सेवनानेही अतिसाराचा त्रास होऊ शकतो. मांसाहारी पदार्थाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन, तेलकट, तिखट आणि चिवडा-फरसाणासारख्या मसालेदार पदार्थांच्या अतिसेवनानेही हगवणीचा त्रास उद्भवू शकतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या विरुद्धाहारामुळेही हगवणीची समस्या निर्माण होऊ शकते. दूध आणि मासे, दूध आणि केळी यांसारख्या पचनक्रियेला त्रासदायक विरूद्धाहारामुळे अतिसार झाल्याचं पाहायला मिळतं. अगोदर खाल्लेल्या अन्नाचं पुरेसं पचन होण्याआधी पुन्हा जेवण केल्यानं अपचनाचा त्रास होतो आणि त्याचं पर्यावसान हगवणीत होतं. मात्र या प्रासंगिक अतिसाराशिवाय कित्येकदा आतड्यांचे विकार, काही जुनाट आजार तसेच अतिरक्ताल्पता यामुळेही अतिसाराचा त्रास होत असतो.
अतिसाराची लागण झाल्यावर वारंवार तहान लागणं, शौच करताना असह्य वेदना होणं तसेच प्रचंड अशक्तपणा येणं, झपाट्याने वजन कमी होणं, शौचातून रक्त पडणं यांसारखी लक्षणं जाणवू लागतात. अतिसार झालेल्या रुग्णाचं शरीर थंड पडणं, शरीरातले त्राण निघून जाणं, चक्कर येऊन डोळ्यांपुढे अंधाऱ्या येणं, मूत्रविसर्जनाच्या तक्रारींत वाढ होणं, श्वासोच्छवास तसेच हृदयांच्या ठोक्यांचा वेग
वाढणं, तोंडाला कोरड पडणं, त्वचा सैल आणि निळसर पडणं इत्यादी लक्षणं दिसतात.

मुळात अतिसाराचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच काही घरगुती उपाय करता येतात. 1) बिन दुधाच्या कपभर गरम चहात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतल्यानं हगवण नियंत्रणात येण्यास मदत होते. 2) दोन चमचे डाळिंबाच्या पानांच्या रसात चमचाभर साखर टाकून घेतल्यानेही हगवण थांबते. 3) ग्लासभर नारळाच्या पाण्यात चमचाभर जिरे वाटून टाकल्यानेही आराम मिळतो. 4) पाण्यात उकडलेली कच्ची पपई दिवसातून दोन ते तीन वेळा खावी. 5) हगवण नुकतीच सुरू झाली असेल तर आयुर्वेदात लंघन म्हणजेच उपवासाचा चांगला उपाय सुचवलेला आहे.

अतिसाराचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. म्हणून संपूर्ण बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा नारळपाणी घ्यावं. त्याचप्रमाणे अर्धा लीटर पाण्यात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. साबुदाण्याची गंजी, तांदळाची पेजही प्यावी. पाणी उकळून थंड करूनच प्यावं. उकळून थंड केलेलं पाणी जास्तीत जास्त वेळा प्यावं. अतिसारात पाणी, विविध सरबते, फळांचे रस, नारळपाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरचे बाहेरील खाद्यपदार्थ तसेच
शिळे अन्न टाळावं. तसेच अतितिखट पदार्थही काटाक्षाने वर्ज्य करावेत.

कित्येकदा घरगुती उपाय करूनही हगवण थांबत नसेल तर तज्ज्ञ डोक्टरांचा सल्ला घेऊन अवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. त्याचप्रमाणे अतिसाराच्या आजारातून बाहेर पडल्यावरही अतिसार पुन्हा उद्भवू नये
म्हणून योग्य काळजी घ्यावी लागते. हगवण थांबली असली तरी खाण्यापिण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. टप्प्याटप्प्याने जेवण वाढवल्यास पोटाच्या आतड्यांना होणारा त्रास टाळणं सोपं जातं.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

एनिमिया : काळजी आणि आहार

शरिरात रक्ताचं प्रमाण कमी होणं म्हणजेच पंडुरोग, याला इंग्रजीत एनिमिया असं म्हणतात. घडाळ्याच्या काट्यांना टांगलेल्या आणि कॅलेंडरच्या आकड्यांना बांधलेल्या हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात एनिमियाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं. आयुर्वेदानुसार अप्राकृत आहार घेण्यामुळं पचनाच्या समस्या निर्माण होतात किंवा शरिराला आवश्यक पोषणमूल्य न मिळाल्यानं शरिरातील रक्ताचं प्रमाण घटतं. विशेषत: अतितिखट, आंबट, तेलकट, मसालेदार तसेच पचायला जड पदार्थांचं वारंवार सेवन केल्यानं शरिराला पोषणमूल्य कमी मिळतं आणि अप्राकृत रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे शरिरात प्राकृत रक्ताचं प्रमाण घटतं. एनिमिया होण्याचं आणखी एक कारण मानसिक आजारांतही दडलेलं आहे. सततच्या भय, चिंता, शोकामुळेही रक्ताल्पता वाढते. आधुनिक आणि मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य देशातील खाद्यसंस्कृतीच्या अतिरेकामुळे रक्ताल्पतेचं प्रमाण वाढू लागलंय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या-त्या देशातील खाद्यपदार्थ हे त्या देशातील पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या नागरिकांना पोषक ठरतात मात्र त्याचं अंधानुकरण करताना आपल्या देशातील पर्यावरणीय परिस्थितीही लक्षात घेणं गरजेचं असतं.

आधुनिक शास्त्रानुसार आहारात लोहांश कमी असणं हेही एनिमियाचं कारण सांगितलं जातं. शरिराच्या सर्वार्थाने वाढीसाठी आवश्यक पालेभाज्या, फळे, दूध आणि दुधाचे पदार्थ अंडी, मांस, मासे खाणं कित्येकदा अवास्तव महागाईमुळे गोरगरीब जनतेला परवडत नाही. यामुळे रक्ताल्पता वाढीस लागते आणि त्याचं पर्यावसान शेवटी एनिमियात होतं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या स्त्रियांच्या आरोग्याबाबतच्या अहवालानुसार भारतात 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी अ‍ॅनिमिया (लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया) होतो. जगातील सुमारे 40 टक्के स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण कमी आढळलं तर भारतीय स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण 50 ते 52 टक्क्यांनी कमी असल्याचं समोर आलं.

लोहाची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना तुलनेने जास्त असते. मुख्यत्वेकरून स्त्रियांच्या आहारातलं लोहाचं प्रमाण कमी झाल्यास मासिकपाळीच्या समस्यांमध्ये वाढ होते. आतडय़ांच्या, जंतांच्या आजारांतही वाढ होते. अशक्तपणा, चक्कर येणे, भूक न लागणे ही लोहाचं प्रमाण कमी होण्याची मुख्य लक्षणं आहेत. तसंच बाळंतपणातील सिझेरीयननंतर प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाल्यामुळेही बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. अर्भके आणि लहान मुलांच्या शरिरातील रक्ताल्पतेमुळे त्यांना तोल सांभाळणे, किंवा योग्य कालावधीत सुसंगत शारीरिक हालचाली होण्यासही अडथळे निर्माण होतात. रक्ताल्पतेची समस्या असणाऱ्या लहान मुलांची मानसिक तसेच बौद्धिक वाढ खुंटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलं उत्तरोत्तर एकलकोंडी आणि संकुचित मनोवृत्तीची बनतात.

लहान मुलं लोहाचा योग्य साठा घेऊनच जन्माला येत असतात. मात्र हा लोहाचा साठा आईचं दूध जोपर्यंत बाळाच्या पोटात जातंय त्यानंतर काही दिवसच पुरत असतो. त्यामुळे स्तनपानाच्या काळात आईच्या रक्तातील लोहाचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे बाळंतपणानंतर आईला लोहगुणसंपन्न आहार देणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा आवश्यकतेनुसार बाळंतपणानंतर आईला गोळ्यांद्वारे लोहाचा पुरवठा करणं गरजेचं असतं.

कित्येकदा निरनिराळ्या औषधांमधून अॅस्पिरिन, पॅरासिटामोल सारखे वैद्यकीय घटक पोटात गेल्याने लाल रक्तपेशी कमी होतात आणि रक्ताल्पता होण्याची दाट शक्यता असते. तसेच केमिकल क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीत रक्ताल्पतेचं प्रमाण वाढताना दिसतं. कित्येकदा मोठ्या आजारपणानंतर शरिरातील लोहाच्या प्रमाण तपासणं गरजेचं असतं. मलेरिया, टायफॉईड, जुना ताप, काविळ यांसारख्या आजारातही एनिमिया होण्याची शक्यता असते.

त्वचेला एकप्रकारचा रुक्षपणा, त्वचा पांढरी दिसणे, कानात आवाज आल्याचे भास, जिभेची चव हरपणे, अल्प श्रमानेही थकल्यासारखं वाटणं, डोळ्यांभोवती तसेच पायाला सूज येणं, वारंवार अंग दुखणं, मांड्या, पाय तसेच कंबरेचं वाढणं आणि मुख्यत: सारखी झोप येत राहाणं इत्यादी एनिमिया म्हणजेच रक्ताल्पतेची लक्षणं मानली जातात. यापैकी कोणतीही लक्षणं जास्त दिवस दिसून आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. योग्य तपासण्यांनंतर एनिमिया अर्थात पंडुरोग झाल्याचं निष्पन्न झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

कित्येकदा अॅनिमिया झालेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोहाच्या गोळ्या घेतात. मात्र लोहाच्या गोळ्यांचा अतिरेक झाल्यास मलावरोध, उलट्या, वारंवार शौचाला होणं (बऱ्याचदा काळ्या रंगाचा शौच पडणं), पोट बिघडणं, आजारी असल्यासारखं वाटणं इत्यादी त्रास होऊ शकतात. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लोहाच्या गोळ्या घ्याव्यात.

करावाच मात्र शरिरातील लोह आणि रक्तप्रमाण वाढण्यासाठी काही पथ्य पाळत आहारात थोडे बदल करणं गरजेचं असतं. पौष्टिक आहाराबरोबरच '' जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं सेवन वाढवावं. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त जीवनपद्धतीत जेवणाच्या वेळा टाळून चहा, कॉफी घेण्याचं प्रमाण नकळत वाढतं. त्यामुळे चहा, कॉफीचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं. बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळावं. आहारात विविधप्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असावा. चाकवत, पालक, मेथीच्या भाज्यांचं सेवन वाढवावं. त्याचप्रमाणे आहारात गाजर, बिटाचं प्रमाणही ठेवावं. शेगदाण्याचे लाडू, चिक्की काही वेळेनंतर अवश्य खावी. अंजीर, खजूर, खारीक, खोबरे तसेच मनुक्याचं प्रमाणही वाढवावं. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी फलाहारही महत्त्वाचा असतो. म्हणूनच जेवणानंतर सफरचंद, द्राक्षे, चिकू, पपई तसेच टरबुजासारख्या फळांचं सेवन अवश्य करावं.

हल्लीची तरुणाई फिटनेसबाबत अधिक सजग असते. त्यासाठी डाएटिंगचा फंडा वापरला जातो. मात्र डाएटिंगचा एवढा अतिरेक होतो की शरिराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जास्त्रोतांची रसद तोडली जाते आणि मग अशक्तपणा वाढतो. डाएटिंगसाठी उपाशी राहण्याचे प्रमाण वाढले तर रक्ताल्पता वाढते आणि अॅनिमियाचा धोका संभवतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाएटिंग करावं. डाएटिंग करताना दर दोन ते तीन तासांनी पुरेसा शरिराला पोषक आहार घ्यावा.


डॉ. कीर्ती ढोबळे, नवी मुंबई

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार

हिवाळ्यात वातावरण कसं असतं, मस्त गाऽऽर…अगदी थंड
वाटतं थंडीत कधी, करूच नये निद्रादेवीशी बंड ॥

सूर्यदेवही जांभया देत, जरा उशिराच उठतो गारठून
गुलाबी थंडीत आपल्या, सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥

रखरखीत उन्हाची काहिली देणारा उन्हाळा, चिंब भिजवणारा पावसाळा आणि थंडीने हुडहुडी भरायला लावणारा हिवाळा अशा तीन ऋतूंपैकी गुलाबी थंडीचा हिवाळा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. मुळात वातावरणात गारवा असल्याने हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे या काळात भूक चांगली लागले. म्हणूनच हिवाळ्यात सर्वप्रकारचा समतोल आहार घ्यावा. विशेषत: या काळात शरिरातील रुक्षता वाढत असल्याने स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवावे. हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस तुलनेने लहान असतो त्यामुळे या काळात वारंवार

भूक लागते. त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व
प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहासारखा
त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत.

थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या

समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या
एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत.
सांधेदुखी- थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे
पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो.

दमा- दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम,

कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी 2 ते 3 कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमठ काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


तळपायाच्या भेगा- हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं
उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. रुक्षान्नाच्या अतिसेवनामुळेही भेगा पडण्याचा आजार बळावू शकतो. म्हणून हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

त्वचेची काळजी- हिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज प्राप्त होऊ शकते.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई
संपर्क- 08655185968